esakal | पोलिसांनी मोडले नियम म्हणूनच वाचले 'त्या' १५ जणांचे प्राण; दबंगगिरी दाखवत आणलं ऑक्सिजन

बोलून बातमी शोधा

पोलिसांनी मोडले नियम म्हणूनच वाचले 'त्या' १५ जणांचे प्राण; दबंगगिरी दाखवत आणलं ऑक्सिजन
पोलिसांनी मोडले नियम म्हणूनच वाचले 'त्या' १५ जणांचे प्राण; दबंगगिरी दाखवत आणलं ऑक्सिजन
sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर ः कोविडमुळे अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या १५ रुग्णांचे तीन तासांत ऑक्सिजन संपणार होते. त्यामुळे हॉस्पिटलमधील डॉक्टरांची तारांबळ उडाली. काही सूचत नसल्यामुळे त्यांना लगेच जरीपटका पोलिसांनी फोन करून मदतीची हाक दिली. त्यावर जरीपटका पोलिसांनी एका ऑक्सिजन प्लांटवर जाऊन बळजबरी तेथून ऑक्सिजनचे ७ बंब आणले आणि रुग्णांचे प्राण वाचवले. १५ जणांचा जीव वाचविण्यासाठी एका पोलिस अधिकाऱ्याला नियम आणि कायद्याला फाटा द्यावा लागला, त्यामुळे त्याला चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: 'आम्ही ऑक्‍सिजन देणार नाही, तुमची सोय तुम्हीच करा'; जिल्हा प्रशासनाची खासगी रुग्णालयांना अट

कामठी मार्गावर तिरपुडे हॉस्पिटल आहे. या रुग्णालयात कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. रविवारी रात्री कोविडचे १५ रुग्ण ऑक्सिजनवर होते. पुढील दोन तासात प्राणवायूचा साठा संपणार होता. रुग्णालयाकडे पर्यायी व्यवस्था नव्हती. ऑक्सिजन संपले की सर्व रुग्णांचा जीव धोक्यात येणार हे नक्की होते.

अखेर मध्यरात्री १ वाजता रुग्णालयातील डॉ. शिवाजी सोपलकर हे जरीपटका ठाण्यात पोहोचले. त्यावेळी पोलिस उपनिरीक्षक महादेव नाईकवाडे कर्तव्यावर होते. डॉ. सोपलकरांनी त्यांना संपूर्ण माहिती दिली तसेच ऑक्सिजनची गरज असल्याचे पत्रही दिले. रुग्णालय प्रशासनाने मौद्याच्या प्लांटमध्ये गाडी पाठविली आहे. मात्र, ऑक्सिजन उपलब्ध नसल्याची बाबही स्पष्ट केली. पुढच्या २ तासात ऑक्सिजनचा साठा संपणार, त्यामुळे सिलेंडर उपलब्ध करून देण्यासाठी मदत करा, अशी विनंती डॉ. त्यांना केली.

आता चौकशीचा तगादा

उपनिरीक्षक नाईकवाडे यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती दिली. ऑक्सिजन अभावी १५ रुग्णांचा जीव धोक्यात येणार असल्याचे सांगितले. यानंतर नाईकवाडे, पोलिस शिपाई प्रकाश महाजन, बांते यांच्यासह डॉक्टर सोपलकर पिवळी नदी येथील ऑक्सिजन प्लांटमध्ये पोहोचले. संचालकांना फोन केला. मात्र, बरेच प्रयत्न करूनही त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर प्लांटमधील कर्मचाऱ्ययंना विनंती केली.

हेही वाचा: चंद्रपुरात कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांच्या नशिबी पाणीही नाही; ऐन उन्हाळ्यात वॉटर ATM बंद

त्यांनीही जिल्हाधिकाऱ्यांचे पत्राशिवाय देता येणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दमदाटी करीत पहाटे साडेतीन वाजता ऑक्सिजनचे सात सिलेंडर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. या सिलेंडर्समुळे सर्व रुग्णांचा जीव वाचला. पोलिस आणि डॉक्टरांना दिलासा मिळाला. मात्र पोलिसांच्या मागे चौकशीचा तगादा लागण्याची शक्यता आहे.

संपादन - अथर्व महांकाळ