पोलिस वाहनाने महिलेला घरी सोडण्यासाठी निघाले; मात्र, रानडुक्‍कर आडवे आले अन्‌...

पोलिस वाहनाने महिलेला घरी सोडण्यासाठी निघाले; मात्र, रानडुक्‍कर आडवे आले अन्‌...

टाकळघाट (जि. नागपूर) : बुटीबोरी येथील बोरखेडी-बुटीबोरी शिवपांदण मार्गावरील निवारा कॉलनी परिसरात महिला बसली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी जाऊन बघितले असता ती दिसली. आस्थेने विचारपूस केली असता तिने आपले नाव छाया प्रभाकर धोपटे (वय 36, रा. चिचोली, खापरखेडा, ता. सावनेर) असल्याचे सांगितले. तिला सुखरूप घरी पोहोचवण्यासाठी पोलिस वाहनाने निघाले. मात्र, वाटेत रानडुक्‍कर आल्याने पुढील घटनाक्रम घडला... 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निवारा कॉलनी परिसरात एक महिला बसली असल्याची शनिवारी रात्री पोलिसांना माहिती मिळाली. माहितीच्या आधारे बबलू भीमसिंग गौतम हे सहकार्यांसह नमुद ठिकाणी गेले. तिची आस्थेने विचारपूर करीत ठाण्यात आणले. ठाण्यात चौकशी केली असता तिने आपले नाव छाया धोपटे सांगितले. तसेच तिने कुठे राहते ते सांगितले. इकडे कशी आली याची माहिती तिने दिली नाही. लॉकडाउनमध्ये महिला एकटी कशी आली याचाच विचार पोलिस करीत होते.

महिला एकटी असल्यामुळे तिला घरी पोहोचवून देण्याचे पोलिसांनी ठरवले. त्यानुसार एमएच-31 डी झेड-364 क्रमांकाच्या वाहनाने पोलिस निघाले. वाहनात चालक खुशाल गुलाब शेगोकर (वय 45, रा. सेलू (काटे), जि. वर्धा), सहायक पोलिस निरीक्षक स्नेहल थोरात, हवालदार साजेद सय्यद, शिपाई हर्षा शेंडे व महिला होती. 

डोंगरगाव-जामठा जवळ वाहन पोहोचले असता अचानक रानडुक्‍कर आडवा आला. यामुळे चालक शेगोकर यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहन पलटी होऊन रस्त्याच्या बाजूला कोसळले. यात वाहन चालक खुशाल शेगोकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. स्नेहल थोरात, साजेद सय्यद व हर्षा शेंडे हे जखमी झाले आहेत. 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांना नागपुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकलला पाठवला होता. रविवारी दुपारी बुटीबोरी पोलिस ठाण्यात खुशाल शेगोकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

हसमुख "खुशाल' व्यक्तिमत्त्व

मृत वाहन चालक हसमुख खुशाल व्यक्‍तिमत्त्वाचे होते. त्यांच्या याच स्वभावामुळे ते सर्वांचे प्रिय होते. त्यांनी कर्तव्यावर असताना कधीच कोणाचा अपमान केला नाही. त्यांच्या चेहऱ्यावर सदैव स्मित हास्य असायचे. त्यांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी दुख व्यक्‍त केले. त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पोलिस तिच्यासाठी ठरले दूत, परंतु...

कोरोनामुळे लॉकडाउनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. यामुळे ठिकठिकाणी नागरिक अडकून पडले आहेत. पोलिस जिवाचे हाल करीत कार्यरत आहेत. अशात एका महिलेसाठी पोलिस दूत ठरले. तिला घरी पोहोचवण्यासाठी निघाले. मात्र, वाटेतच अपघात झाल्याने एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. 

महिला सुखरूप

एकटी असलेल्या महिलेला घरी सोडून देण्यासाठी पोलिस निघाले. वाटेत रानडुक्‍कर आडवे आल्याने वाहनाला अपघात झाला. यात वाहन चालक पोलिसाचा मृत्यू झाला तर अन्य तिघे जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या अपघातात त्या महिलेला काहीच लागले नाही. ती पूर्णपणे सुखरूप आहे. 

तरीही पोलिसांनी तिला सोडले घरी

महिलेला घेऊन जाणाऱ्या पोलिस वाहनाचा अपघात झाल्याची माहिती समजताच अन्य वाहन पोलिसांच्या मदतीला गेले. अपघातात आपल्या एका सहकाऱ्याचा जीव गेल्याचे माहिती असतानाही पोलिसांनी दुख बाजूला सारून महिलेला रात्रीच घरी नेऊन सोडले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com