esakal | कर्मचाऱ्यांनो! 11च्या आधी पोहोचा कार्यालयात, अन्यथा जावे लागेल पोलिस ठाण्यात

बोलून बातमी शोधा

Lockdown
कर्मचाऱ्यांनो! 11च्या आधी पोहोचा कार्यालयात, अन्यथा जावे लागेल पोलिस ठाण्यात
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोणत्याही परिस्थितीत कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे. त्यामुळे कार्यालयात जाणाऱ्या निर्धारित कर्मचाऱ्यांनी अकरा वाजताच्या आत कार्यालयात पोहचावे, अन्यथा सबळ कारण नसल्यास अशा कर्मचाऱ्यांना पोलिस ताब्यात घेतील. त्यांची चौकशीअंती विनाकारण उशिरा जात असल्याचे लक्षात आल्यास गुन्हे दाखल करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे, असे संकेत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. यासोबतच रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर केवळ दंडात्मक कारवाई करणे पुरेसे नसून त्यांच्यावरही थेट गुन्हे दाखल करून ताब्यात घेण्याची तयारी पोलिसांनी केली आहे.

हेही वाचा: 'ते' पाळतात माणुसकीचा धर्म! मुस्लिम तरुण रचतात चिता अन्‌ देतात भडाग्नीही; 923 मृतांवर अंत्यसंस्कार

कडक लॉकडाउनच्या अंमलबजावणीला पोलिसांनी सुरुवात केली असून, गुरुवारी रात्री ८ वाजताच पोलिसांनी शहरात प्रवेश करणाऱ्या आठ नाक्यांची नाकाबंदी केली. यात कोराडी, कामठी, हिंगणा, वाडी, पारडी, दिघोरी, काटोल व जामठ्यानजिकच्या नाक्याचा समावेश आहे. या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून, प्रवेशाचे प्रमाणपत्र असणाऱ्यांनाच शहरात प्रवेश व बाहेर जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे. विनाकारण प्रवेश करणाऱ्यांची वाहने जप्त करण्यात येणार आहे.

नियमानुसार जीवनावश्यक वस्तुंची विक्री करणाऱ्या दुकानदारांनी सकाळी ११ नंतर दुकाने उघडी ठेवल्यास महापालिकेच्या पथकाची वाट न बघता निर्धारित वेळेनंतर सुरू असलेली दुकाने सील करा. मालकाविरुद्ध कारवाई करून त्याची पोलिस दफ्तरी नोंद घ्या,असे आदेशही अमितेश कुमार यांनी दिले. दुचाकी वाहनावर केवळ चालक, कारमध्ये केवळ दोघे तर ऑटोत चालकासह केवळ दोन जण प्रवास करीत असल्याची खात्री करा. यापेक्षा अधिक प्रवासी दिल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल.