esakal | 'ते' पाळतात माणुसकीचा धर्म! मुस्लिम तरुण रचतात चिता अन्‌ देतात भडाग्नीही; 923 मृतांवर अंत्यसंस्कार

बोलून बातमी शोधा

crematorium
'ते' पाळतात माणुसकीचा धर्म! मुस्लिम तरुण रचतात चिता अन्‌ देतात भडाग्नीही; 923 मृतांवर अंत्यसंस्कार
sakal_logo
By
सूरज पाटील

यवतमाळ : कोरोनामुळे अवघे जीवनच बदलून गेले आहे. कालपर्यंत आपल्यासोबत असणारे प्रिय व्यक्ती "न सांगता, न बोलता' अखेरचा श्‍वास घेत आहेत. कित्येकांना अखेरचा निरोपही देता येत नाही. काळच इतका क्रूर झाला आहे. अशास्थितीत कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या अंत्यसंस्कारासाठी कोणी पुढे येत नाही. मात्र, शहरातील दोन मुस्लिम तरुण मागील वर्षभरापासून स्थानिक पांढरकवडा रोडवरील हिंदू स्मशानभूमित अंत्यसंस्काराचे सोपस्कार पार पडत आहेत. तेच चिताही रचतात अन्‌ भडाग्नी देऊन अंत्यसंस्कारही पूर्ण करतात.

हेही वाचा: कन्हान रुग्ण मृत्यूप्रकरण: आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत, जबाबदारी घेणार कोण? संतप्त कुटुंबीयांचा प्रश्न

अब्दुल जब्बार आणि शेख अहमद, अशी अंत्यसंस्कारासाठी झटणाऱ्या तरुणांची नावे आहेत. आपल्या प्रीयजनांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो लोकांची उपस्थिती असलेल्या असलेल्या अंत्ययात्रा यवतमाळच्या याच स्मशानभूमीने बघितल्या आहेत. आज मात्र कोरोनामुळे परिस्थिती बदलली आहे. रक्ताचे आणि अगदी जवळचे नातेवाईक मृतदेहाला स्पर्श करायला धजावत नाहीत. इतकेच काय कित्येक जण मोक्षधामातही येत नाहीत.

अशा विपरीत परिस्थितीत नगरपालिकेचे नियुक्त चार कर्मचारी रुग्णवाहिकेमधून मोक्षधामात मृतदेह उतरवितात. तर धर्माने मुस्लिम असलेले अब्दुल जब्बार आणि शेख अहमद हे दोघे हिंदू धार्मिक विधीनुसार कोणतीही भीती न बाळगता चिता रचून अंत्यसंस्कार करतात. मागच्या वर्षांपासून कोरोना काळात झालेल्या 923 मृतदेहांवर हिंदू धर्माच्या विधीनुसार अंत्यसंस्काराचे काम बजावणारे अब्दुल आणि शेख अहमद हे कोरोना योद्धाच आहेत.

हेही वाचा: धक्कादायक! ऑक्सिजन मास्क फेकून कोरोनाग्रस्ताचं रुग्णालयातून पलायन; परिसरात कोरोना संसर्गाची भीती

आयुष्यभर जात, धर्म करणारा माणूस जेव्हा चार खांद्यावर जातो. त्याच्या अंतिम प्रवासात साथ देणारे हात माणसांचेच असतात. मृत्यूचा कालावधी कोरोना सारखा विकराल असेल तर मृत्यू आणि अंत्यसंस्कार हे क्षण "नि:शब्द' करून सोडतात. आपलेही परके होऊन जातात. बिकटच्या परिस्थितीत परिवार, कुटुंब, धर्म आणि समाज बाजूला ठेवून अंतिमसंस्कार करण्यासाठी जिवाची बाजी लावणारे कोरोनायोद्घा शासकीय सोयीसुविधांपासून उपेक्षितच आहेत.

कोरोना मृत्यूच्या संख्येत मागील काही दिवसांत वाढ झाली आहे. मृतांचे नातेवाईक दूरच उभे राहतात. स्मशानभूमीत येण्याची कुणीही हिंमत करीत नाही. मृताच्या धार्मिक रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार करण्याचे काम आम्ही करीत आहोत.

-अब्दुल जब्बार, अंत्यसंस्कार करणारा तरुण.

संपादन - अथर्व महांकाळ