esakal | सोशल मीडियावर खुद्द पोलिसांचे शस्त्रासह फोटो, कोण करणार कारवाई?
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Police

सोशल मीडियावर शस्त्रासह खुद्द पोलिसांचे फोटो, कोण करणार कारवाई?

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : सर्वसामान्य नागरिकांनी जर शस्त्रासह असलेले फोटो सोशल मीडियावर (weapon photo on social media) व्हायरल केल्यास तातडीने कारवाई केली जाते. पोलिसांनासुद्धा सोशल मीडियावर शासकीय शस्त्रासह फोटो टाकण्यास मनाई आहे. यानंतरही काही उत्साही पोलिस सेल्फी किंवा फोटो सोशल मीडियावर टाकून रुबाब दाखवतात. सामान्यांवर बडगा उगारला जात असताना पोलिसांवर कोण आणि काय कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (police upload photo with weapons on social media)

हेही वाचा: 'ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला नाहीतर PM फंडमधून प्लांट का सुरू केले?'

पोलिस विभागाला शिस्तप्रिय खाते म्हणून ओळखले जाते. शिस्तीचा भंग केल्यास पोलिस प्रशासन थेट कारवाईचा बडगा उगारते. तरीही राज्य पोलिस दलातील अनेक कर्मचारी खाकी वर्दी अंगात चढविल्यानंतर ‘सैराट’ झाल्यासारखे वागतात. पोलिस कर्मचारीच नव्हे तर अधिकाऱ्यांनासुद्धा सर्व्हिस रिव्हॉल्वरसह फोटो सोशल मीडियावर टाकण्याचा मोह आवरत नाही. अनेकजण व्हॉट्सॲपच्या डीपीवर शासकीय पिस्तुलसह फोटो टाकतात. तसेच काही पोलिस कर्मचारी खाकी वर्दी आणि पिस्तुलसह फेसबुकवर प्रोफाइल फोटो ठेवतात. फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर स्टेटसमध्येही शासकीय शस्त्रांसह फोटो ठेवले जातात. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये चुकीचा संदेश जातो. केवळ दहशत किंवा परिसरातील नागरिकांवर वचक ठेवण्यासाठीच पोलिस कर्मचारी फेसबुक आणि व्हॉट्सॲपर शस्त्रासह फोटो ठेवत असल्याची चर्चा आहे. पोलिस कर्मचाऱ्यांच्या अशा कृत्याकडे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष असते. शिस्तभंगाशिवाय अन्य कोणतीही कारवाई करीत होत नसल्यामुळेच असे प्रकार वाढत आहेत.

वरिष्ठांनी घ्यावी दखल -

शहर पोलिस दलातील अनेक पोलिस कर्मचारी वाढदिवस किंवा घरातील अन्य कार्यक्रमाच्या दिवशी आपापल्या वस्तीत मोठमोठे फ्लेक्स लावून वर्दी आणि शासकीय शस्त्रासह फोटो छापतात. सोशल मीडियावर शस्त्रासह फोटो ठेवल्यास चमकोगिरी करण्याची संधी मिळते. त्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.

पोलिस महासंचालक कार्यालयाकडून जे दिशानिर्देश दिलेले आहेत. त्यानुसार पोलिस कर्मचाऱ्यांनी पालन करणे बंधनकारक आहे. पोलिस खाते शिस्तप्रिय म्हणून ओळखले जाते. त्यामुळे प्रत्येकाने शिस्त पाळणे अपेक्षित आहे. जर कुणी नियमांचे उल्लंघन करीत असेल तर नियमानुसार कारवाई होईल.
- सुनील फुलारी (प्र, सहपोलिस आयुक्त)
loading image