esakal | नागपूरकरांनो सावधान! विनाकारण बाहेर पडल्यास थेट गुन्हा होणार दाखल; लॉकडाउनमध्ये पोलिस सज्ज
sakal

बोलून बातमी शोधा

नागपूरकरांनो सावधान! विनाकारण बाहेर पडल्यास थेट गुन्हा होणार दाखल; लॉकडाउनमध्ये पोलिस सज्ज

नागपूरकरांनो सावधान! विनाकारण बाहेर पडल्यास थेट गुन्हा होणार दाखल; लॉकडाउनमध्ये पोलिस सज्ज

sakal_logo
By
अनिल कांबळे @anilkambleSakal

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केल्याप्रमाणे बुधवारी रात्रीपासून शहरात दिवसा जमावबंदी आणि रात्रीच्या संचारबंदीला प्रारंभ झाला आहे. नागपूर पोलिसांनीही शहरातील सुरक्षेसाठी कंबर कसली आहे.

पोलिस कर्मचारी १७ वाहने शहरभर फिरवून जनजागृती करणार आहेत. अनाऊन्समेंट करून नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करणार आहेत. विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांना इशारा देण्यात येणार आहे. त्यानंतर त्याचे नाव व मोबाईल क्रमांक नोंदविण्यात येईल. पुन्हा तोच नागरिक विनाकारण फिरताना आढळल्यास त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा पर्यायही पोलिसांकडे आहे.

संवेदनशील ठिकाणी पोलिसांची गस्तही वाढविण्यात आली आहे. शहरातील नाक्यांवरही पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अत्यावश्यक कामाशिवाय कोणत्याही वाहनाला नागपुरात प्रवेश देण्यात येणार नाही. गत काही दिवसांत कोव्हिड हॉस्पिटलमध्ये तोडफोड जाळपोळीच्या घटना घडल्या. त्यामुळे शहरातील कोव्हिड हॉस्पिटललाही पोलिसांचे सुरक्षा कवच देण्यात आले आहे. या ठिकाणी दिवस व रात्रपाळीला दोन कर्मचारी तैनात करण्यात आले आहे.

६६ ठिकाणी नाकेबंदी

शहरातील विविध ६६ ठिकाणी पोलिसांची नाकेबंदी करण्यात आली आहे. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांविरुद्ध साथरोग कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात येणार असून, विनाकारण फिरणाऱ्या वाहनचालकांची वाहने जप्त करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले आहेत.

-सुमारे अडीच हजार पोलिस तैनात

-राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन तुकड्या

-५०० होमगार्डचाही समावेश

संपादन - अथर्व महांकाळ