
महापौर संदीप जोशी यांनी तीन सप्टेंबरला खाजगी डॉक्टरांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी वाढत्या बाधितांसाठी बेड उपलब्ध करून देण्याची इच्छा व्यक्त केली होती. डॉक्टरांनी त्याचवेळी नकारात्मक भूमिका मांडली.
बापरे हे काय... कोव्हिड सेंटर तयार करण्यास खाजगी रुग्णालयांचे हात वर, वाचा सविस्तर
नागपूर : महापौरांच्या बैठकीत मनुष्यबळ उपलब्ध करून दिल्यास सेवा देता येईल, असे सांगून हात वर करणाऱ्या खाजगी डॉक्टरांनी आता रुग्णालयाचे पूर्णपणे कोव्हिड सेंटर करण्यासही नकार दिला आहे. याबाबतचे पत्रच महापालिकेला दिले आहे. त्यामुळे बाधितांसाठी बेड वाढविण्याच्या महापौर संदीप जोशी, महापालिका प्रशासनाच्या मनसुबे तूर्तास उधळल्याचे दिसून येत आहे. एवढेच नव्हे शासकीय दराने उपचारामुळे मालमत्ता कर, विजेचा वाणिज्यिक दर आकारणे बंद करा, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
महापौर संदीप जोशी यांनी तीन सप्टेंबरला खाजगी डॉक्टरांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी वाढत्या बाधितांसाठी बेड उपलब्ध करून देण्याची इच्छा व्यक्त केली होती. डॉक्टरांनी त्याचवेळी नकारात्मक भूमिका मांडली. आता विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनने महापालिकेला पत्र देऊन बळपूर्वक खाजगी रुग्णालयांना कोव्हिड सेंटर करू नये, ते असंवैधानिक असल्याचे म्हटले आहे.
ठळक बातमी - अखेर मुंढेंच्या मनासारखे काय झाले? वाचा सविस्तर
शहरात बेडची कमतरता असल्याने बाधितांना उपचारासाठी महापालिकेने खाजगी हॉस्पिटलकडून मदतीची जी अपेक्षा केली होती, त्याचा चांगलाच धक्का बसला आहे. याशिवाय खाजगी रुग्णालयांनी अनेक समस्या पुढे केल्या आहेत. यातील काही वैद्यकीय तथ्यांवर आधारित आहेत. मात्र, बहुसंख्या समस्या या हात झटकणाऱ्या आहेत. दर दिवशी एका रुग्णासाठी एक पीपीई किट वापरण्याचे बंधनकारक करणे हे रुग्णाच्या सेवेत अडथळा असल्याचे असोसिएशनने म्हटले आहे.
आरोग्य विम्याची रक्कम मिळवण्यासाठी विमा कंपन्या अनेक शंका उपस्थित करीत असून, रुग्णांनी पैसे द्यावे त्यानंतर परताव्यासाठी दावा करावा अशी सुविधा हवी, असेही या पत्रात म्हटले आहे. खाजगी रुग्णालये उत्तम सेवा देत असतानाच महापालिकेकडून होणारी सततची तपासणी, ऑडिट, कागदपत्राची मागणी तसेच कारवाईची धमकी देणे बंद करावे, अशी मागणीही असोसिएशनने केली आहे.
कोव्हिड रुग्णांना उपचारासाठी दर निश्चित केले, त्याच पद्धतीने ऑक्सिजनच्या वाढत्या दरावर तसेच बायो मेडिकल वेस्टच्या विल्हेवाटीसंदर्भातील वाढत्या दरावरही नियंत्रणाचा मुद्दाही खाजगी रुग्णालयांनी पुढे केला आहे. उपचारासाठी दर निश्चित केले, अशा स्थितीत रुग्णालयांनी वाणिज्यिक दराने मालमत्ता कर, विजेचे देयके का भरावे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
डॉक्टरांनाही हवे विम्याचे कवच
शहरातील अनेक खाजगी डॉक्टर उपचार करताना कोरोनाबाधित झाले आहेत. त्यातील काहींचा मृत्यूही झाला. शासकीय रुग्णालयांत सेवा देणाऱ्या खाजगी डॉक्टरांप्रमाणेच खाजगी डॉक्टरांनाही विम्याचे कवच देण्यात यावे, अशी मागणीही मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांना दिलेल्या पत्रातून करण्यात आली आहे.
संपादन : अतुल मांगे
Web Title: Private Hospitals Refuse Covid Centers
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..