esakal | आता घड्याळाद्वारेही शिंपडता येणार सॅनिटायजर, तरुणानं तयार केलीय 'रोल ऑन वॉच'
sakal

बोलून बातमी शोधा

roll on watch

आता घड्याळाद्वारेही शिंपडता येणार सॅनिटायजर, तरुणानं तयार केलीय 'रोल ऑन वॉच'

sakal_logo
By
केतन पळसकर

नागपूर : एकविसावे शतक स्पर्धेचे युग म्हणून ओळखले जाते. या काळात प्रत्येक जण प्रत्येक गोष्टीत नावीन्य शोधायचा प्रयत्न करतो. तर, तरुण पिढी समाजाला काही नावीन्यपूर्ण देण्यासाठी धडपडत असते. असाच एक मनगटावरील घडाळ्याचा (रिस्ट वॉच) (roll on watch) प्रयोग प्रियरंजन सिंग (priyaranjan singh) या तरुणाने केला असून तो यशस्वीसुद्धा केला आहे. (priyaranjan singh made roll on watch which spray sanitizer)

हेही वाचा: ८० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाने दिली कोरोनाला मात; कधीही पडले नाही घराबाहेर

आजवर आपण ॲनलॉग, डिजिटल स्वरूपामध्ये घड्याळ पाहिले आहेत. मात्र, या पठ्ठ्याने ‘रोल ऑन’ प्रणालीचा वापर करून सॅनीटायजर शिंपडणारे घड्याळ तयार केले आहे. बावीस वर्षीय प्रियरंजन सिंग याने दिल्ली पब्लिक स्कूल येथून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे. तर, नोईडा येथील ॲमीटी विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात तो आपली पदवी पूर्ण करतो आहे. फक्त सॅनीटायजरच काय तर विविध ऋतूमध्ये उपयोगी पडणारे द्रव स्वरूपातील कुठलाही पदार्थ या घड्याळामध्ये आपण टाकून अगदी सहज वापरू शकू. वैद्यकीय, क्रीडा, मनोरंजन इतकेच काय तर नट्टा-पट्टा करीत मिरविणाऱ्या तरुणींसाठी हे घड्याळ उपयोगी ठरणार आहे. तर, सॅनिटायजर बाळगणे अत्यंत सोपे होणार असल्यामुळे सामान्य नागरिकांसाठी हे वरदान ठरणार आहे. कारण, एकाच व्यक्तीच्या हाती हे घड्याळ राहणार असल्याने सॅनीटायजरच्या बॉटल प्रमाणे त्याला वारंवार असंख्य लोकांचे हात लागणार नाही. त्यामुळे, संसर्ग पसरण्याचा धोका नसेल.

रोल ऑन प्रणाली म्हणजे काय?

मनगटाला असणाऱ्या घड्याळाला तीन रूळ जोडलेले असतील. हे रूळ अर्धे सॅनीटायजरने भरलेल्या पेटीमध्ये तर अर्धे बाहेर असतील. रूळ लाटण्यासारखा फिरवताच त्याचा आतील भाग (भिजलेला) वर येईल आणि हाताला सॅनिटायजर लागेल. यामध्ये कुठल्याही तंत्राचा वापर होणार नसल्याने अवघ्या साठ ते शंभर रुपयांमध्ये हे घड्याळ उपलब्ध होऊ शकेल.

कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात महाविद्यालयात झालेल्या एका कार्यशाळे दरम्यान सॅनीटायजरच्या वापराबाबत चर्चा झाली होती. या दरम्यान ही संकल्पना माझ्या डोक्यात आली. पुढील काही दिवसात मी ही संकल्पना सत्यात उतरविली आणि पेटंट मिळविण्यासाठी अर्ज केला.
-प्रियरंजन सिंग, संशोधक, रोल ऑन वॉच.