esakal | कुटुंब स्वीकारत नाही, गंगाजमुनात जगता येत नाही; वारांगनांची व्यथा

बोलून बातमी शोधा

gangajamuna
कुटुंब स्वीकारत नाही, गंगाजमुनात जगता येत नाही; वारांगनांची व्यथा
sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : वयाची १६ वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच प्रियकरासोबत घरातून पळ काढला. त्याने काही दिवस सुखाने संसार केला. त्यानंतर पैशाची चणचण भासू लागली. त्यामुळे त्याने मला मध्य प्रदेशातील एका वेश्‍यावस्तीत विकले. वारांगना म्हणून ओळख निर्माण झाली. घराकडे परतणारे रस्ते बंद झाले. आजची स्थिती पाहता जीव नकोसा होतो. लॉकडाउनमुळे जीवन जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. घराकडे जाण्याचा विचार केल्यास कुटुंब स्वीकारणार नाही, अशी व्यथा गंगाजमुनातील कोमल (वय ३२, बदललेले नाव) या वारांगनेने 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.

हेही वाचा: दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : अखेर एम. एस. रेड्डीला नागपुरातून अटक

महिन्याभरापासून कडक लॉकडाउनचा फटका जवळपास सर्वच व्यवसायांना बसला आहे. वेश्‍याव्यवसायसुद्धा प्रभावित झाला आहे. गंगाजमुना ही शहरातील बदनाम वस्ती. १५० वर्षांपूर्वी ही वस्ती निर्माण झाली. या वस्तीत जवळपास ५ हजार वारांगनांचे वास्तव्य आहे. मात्र, गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे गंगाजमुनात आता केवळ ५०० ते ६०० वारांगना आहेत. कडक लॉकडाउन असल्यामुळे लकडगंज पोलिसांनी वारांगनांच्या महिला दलाल आणि घरमालकिनींशी चर्चा करून 'शून्य ग्राहक' अभियान सुरू केले. गंगाजमुना वस्तीला बॅरिकेड्स लावून पूर्णपणे सील केले. कोरोनाचा प्रसार थांबावा, या प्रामाणिक उद्देशातून परिसर बंद करण्यात आला. मात्र, नाण्याची दुसरी बाजू उघडी पडली. त्याकडे ना मनपा प्रशासनाचे लक्ष आहे ना पोलिस प्रशासनाचे. त्यामुळे अनेक दिवसांपासून शून्य कमाई असलेल्या वारांगना कोणत्या स्थितीत जगत आहेत, याकडे दुर्लक्ष झाले आहे. आता पुन्हा १५ दिवसांचे लॉकडाउन लागल्यामुळे गंगाजमुनात जेमतेम असलेल्या वारांगनांपुढे जीवन-मृत्यूचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

गंगाजमुनातील वारांगना कोमल म्हणाली की, पदरचे पैसे आता संपले आहेत. माझ्या सोबत असलेल्या सहकारी वारांगना राज्य सोडून गेल्या आहेत. मला घराचे दरवाजे बंद आहेत. तर गंगाजमुनात खायचे वांदे आहेत. गंगाजमुनातून बाहेर पडून रोजगार शोधावा तर तो मिळणे शक्य नाही. तसेच वारांगनेला कामही कुणी देणार नाही. त्यामुळे आता डोक्यावरचे आभाळच फाटल्याची स्थिती आहे.

हेही वाचा: "राहू द्या नं भाऊ.. वर्षभरापासून आम्ही अपमानच सहन करतोय"; कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणाऱ्यांना उपेक्षेची वागणूक

ग्राहकही फिरकत नाही -

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे मास्क लावणे अनिवार्य आहे. वारांगनांनी मास्क लावला तरीदेखील भीतीपोटी ग्राहक फिरकत नाही. परंतु, ग्राहक कोणत्याही स्थितीत आल्यास किंवा तो संक्रमितही असल्यास नाइलाजास्तव नकार देता येत नाही. कोरोनाच्या काळात व्यवसाय करण्याची भीती वाटते; पण पोटासाठी करावा लागतो, अशी प्रतिक्रिया एका वारांगणेने दिली.

कुणीतरी पुढाकार घ्यावा -

महापालिका प्रशासन किंवा जिल्हा प्रशासनाने दुर्लक्षित घटक असलेल्या वारांगनांच्या उत्थानासाठी पुढाकार घ्यावा. सध्या काही सामाजिक संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या परीने मदत करीत आहेत. परंतु, ते किती दिवस पुरतील. त्यामुळे लॉकडाउनचा काळ संपेपर्यंत शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी गंगाजमुनातील वारांगना करीत आहेत.