esakal | निकाल वेळेत देणे होणार कठीण ! विद्यापीठ, शिक्षण विभागासमोर प्रश्‍नचिन्ह
sakal

बोलून बातमी शोधा

exam

केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशातील विद्यापीठांच्या परीक्षा, वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन शास्त्राच्या प्रवेश परीक्षांसह सीबीएसई आणि राज्य मंडळांच्या निकालांवर याचे गंभीर परिणाम होणार आहेत.

निकाल वेळेत देणे होणार कठीण ! विद्यापीठ, शिक्षण विभागासमोर प्रश्‍नचिन्ह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळा- महाविद्यालयांना सुट्या तर विद्यापीठ आणि बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे 31 मार्चपर्यंत परीक्षा स्थगीत करण्यात आल्यात. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत देशभरात संचारबंदी लागू केल्यामुळे विद्यापीठांच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा आणि दहावी, बारावीच्या निकालावर याचा मोठा परिणाम होणार आहे.

राज्य शासनाने सर्व विद्यापीठांच्या परीक्षांना 31 मार्चपर्यंत स्थगिती दिली होती. त्यानंतर 23 मार्चचा इयत्ता दहावीचा भूगोलाचा पेपरही पुढे ढकलण्यात आला. 31 मार्चनंतर राज्यातील स्थिती सुधारेल असा सर्वांना विश्वास होता. मात्र, राज्य आणि देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे पंतप्रधानांनी संपूर्ण राज्यात 14 एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशातील विद्यापीठांच्या परीक्षा, वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन शास्त्राच्या प्रवेश परीक्षांसह सीबीएसई आणि राज्य मंडळांच्या निकालांवर याचे गंभीर परिणाम होणार आहेत. राज्यात बहुतांश विद्यापीठांच्या परीक्षा मार्च ते जून या कालावधीमध्ये होतात. दहावी आणि बारावीचे निकाल मे महिन्यात जाहीर होत असून जूनपासून सर्व प्रवेश प्रक्रियांना सुरुवात केली जाते. मात्र, आता 14 एप्रिलपर्यंत संचारबंदी असल्यामुळे परीक्षा, निकाल आणि प्रवेशाचे नियोजन पूर्णपणे बिघडणार आहे. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व परीक्षार्थिंना पुढील वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे. मात्र, इयत्ता दहावीचा स्थगित झालेला भूगोलाचा पेपर घेणे, या सर्व परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करणे बंदमुळे कठीण होणार आहे. विद्यापीठातील सर्व परीक्षा उच्च शिक्षणाच्या असल्यामुळे विद्यार्थ्यांना सरळ उत्तीर्ण करणे अशक्‍य आहे. त्यामुळे विद्यापीठांना परीक्षा घेणे, त्यांचे नवे वेळापत्रक तयार करणे, त्या वेळेत संपवणे प्रशासनाला कठीण होणार आहे.

तिसरा टप्प्यातील परीक्षा पुढे जाणार ?
विद्यापीठाच्या परीक्षा पाच मार्चला सुरू झाल्यात. 19 मार्चपासून दुसरा टप्पा सुरू करायचा होता. मात्र, 31 मार्चपर्यंत राज्यात जमावबंदीची घोषणा केल्याने यादरम्यानच्या 187 परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यात. मात्र, आता 14 एप्रिलपर्यंत संचारबंदी असल्याने तिसऱ्या टप्प्यातील परीक्षाही रद्द करण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

नियोजन कठीण
एकविस दिवस सर्वकाही बंद राहणार असल्यामुळे विद्यापीठांना परीक्षांचे नियोजन आखणेही कठीण होणार आहे. यासह दहावी, बारावीच्या निकालावरही याचा परिणाम होणार असून प्रवेश प्रक्रियाही प्रभावित होणार आहे. त्यामुळे परीक्षा, निकाल व प्रवेशाचे नियोजन करणे राज्य सरकारसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.