esakal | पुढील दोन दिवस जोरदार; प्रादेशिक हवामान विभागातर्फे इशारा, संततधार पावसाने नागपूरकर सुखावले
sakal

बोलून बातमी शोधा

पुढील दोन दिवस जोरदार; प्रादेशिक हवामान विभागातर्फे इशारा

पुढील दोन दिवस जोरदार; प्रादेशिक हवामान विभागातर्फे इशारा

sakal_logo
By
नरेंद्र चोरे

नागपूर : काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या वरुणराजाने विदर्भात पुन्हा धडाक्यात ‘एंट्री’ मारली आहे. शहरात बुधवारी दिवसभर बरसलेल्या संततधार पावसाने नागपूरकर सुखावले आहेत. विदर्भात सध्या मॉन्सून सक्रिय असून, आणखी दोन दिवस जोरदार पावसाचा इशारा प्रादेशिक हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे. (Rain-news-Heavy-rain-for-the-next-two-days-Regional-Meteorological-Department- warning-nad86)

शहरात सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. दिवसभर कधी रिमझिम तर कधी धो-धो पाऊस कोसळला. संततधार पावसामुळे रस्त्यांवर सगळीकडे पाणीच पाणी दिसत होते. अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये गुडघाभर पाणी साचले होते. दिवसभर वरुणराजाची संथपणे फटकेबाजी सुरू राहिल्याने चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

हेही वाचा: सत्तांतरानंतर प्रश्न रखडला; पाच एव्हरेस्टवीर नोकरीच्या प्रतीक्षेत

पावसामुळे नागपूरकरांना दिवसभर घराबाहेर पडता आले नाही. नरेंद्रनगर पुलाखाली नेहमीप्रमाणे गुडघ्यापर्यंत पाणी जमा झाल्याने पाण्यातून वाहने काढताना वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागली. अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याच्या तक्रारी मनपाच्या अग्निशमन विभागाकडे आल्या. पावसामुळे कमाल तापमानातही चार अंशांची घट होऊन पारा २६.५ अंशांवर आला.

गुरुवारी, शुक्रवारी ‘ऑरेंज अलर्ट’

शहरात सायंकाळी साडेपाचपर्यंत २६ मिलिमीटर पावसाची नोंद हवामान विभागातर्फे करण्यात आली. हवामान विभागाने गुरुवारी व शुक्रवारी नागपूरसह विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असल्याने पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. विदर्भात सगळीकडेच दमदार पाऊस बरसल्याचे वृत्त आहे. आजच्या पावसामुळे कोमेजलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाल्याने बळीराजाही खुश आहे. या पावसाचा सर्वाधिक फायदा पूर्व विभागातील धनपट्ट्याला होणार आहे.

(Rain-news-Heavy-rain-for-the-next-two-days-Regional-Meteorological-Department- warning-nad86)

loading image