esakal | सत्तांतरानंतर प्रश्न रखडला; पाच एव्हरेस्टवीर नोकरीच्या प्रतीक्षेत
sakal

बोलून बातमी शोधा

सत्तांतरानंतर प्रश्न रखडला; पाच एव्हरेस्टवीर नोकरीच्या प्रतीक्षेत

सत्तांतरानंतर प्रश्न रखडला; पाच एव्हरेस्टवीर नोकरीच्या प्रतीक्षेत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राजुरा (जि. चंद्रपूर) : मिशन शौर्य-२०१८ अंतर्गत कोरपना, जिवती तालुक्यातील पाच विद्यार्थ्यांनी जगातील सर्वाधिक उंचीचे एवरेस्ट शिखर सर केले. तत्कालीन सरकारने त्यांना नोकरीचे आश्वासन दिले होते. मात्र, राज्यात सत्तांतर झाले. त्यामुळे या एव्हरेस्टवीरांच्या नोकरीचा प्रश्न शासनदरबारी धूळखात पडला आहे. पाच पंचरत्नांना शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार गृहविभागात नोकऱ्या देण्यात याव्या, अशी मागणी माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी नुकतेच माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात शासनाकडे केली आहे. (Chandrapur-District-news-Job-assurance-Former-MLA-Sudarshan-Nimkar-MLA-Sudhir-Mungantiwar-nad86)

राज्याचे तत्कालीन अर्थ, नियोजन व वन मंत्री तथा पालकमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून तत्कालीन जिल्हाधिकारी आशुतोष सलील, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी डी. दयानिधी राजा यांच्या उत्कृष्ट नियोजनातून आदिवासी विकास विभाग व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने मिशन शौर्य-२०१८ हे अभियान राबविण्यात आले. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील उपक्रमाअंतर्गत राजुरा विधानसभा क्षेत्रातील कोरपना व जिवती या अतिदुर्गम आदिवासी बहुल नक्षलग्रस्त भागातील दहा पैकी पाच विद्यार्थ्यांनी जगातील सर्वांत उंचीचे एव्हरेस्ट शिखर सर केले. या एव्हरेस्ट शिखरावर झेंडा रोवला. देशाचे नाव उज्ज्वल केले.

हेही वाचा: हवामान तज्ज्ञांनी पावसाबाबत दिले संकेत; चिंता वाढणार की कमी होणार?

त्यांच्या उत्तुंग कामगिरीमुळे देशासह महाराष्ट्राची, चंद्रपूर जिल्ह्याची आणि आदिवासी विकास विभागाची मान अभिमानाने उंचावली होती. या गरीब आदिवासी विद्यार्थ्यांच्या विक्रमी कामगिरीबद्दल देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंह, तत्कालीन गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, तत्कालीन राज्यपाल विद्यासागरराव, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन अर्थ, नियोजन व वन मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, तत्कालीन आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्यासह सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी व मान्यवरांनी सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले होते.

या पंचरत्न शौर्यवीरांना आमदार मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून शासनाकडून प्रत्येकी २५ लाख रुपये सानुग्रह अनुदान दिले. शिक्षण पात्रतेनुसार गृहविभागात विशेष बाब या सदराखाली नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर त्यांच्या नोकरीचा प्रश्न मागे पडला. दरम्यान, माजी आमदार निमकर यांनी पंचरत्नांच्या नोकरीचा मुद्दा रेटून धरला. जिल्हाधिकारी गुल्हाने यांना निवेदन दिले. त्यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले.

(Chandrapur-District-news-Job-assurance-Former-MLA-Sudarshan-Nimkar-MLA-Sudhir-Mungantiwar-nad86)

loading image