
Nagpur : सहा उमेदवार उभे करण्याचे डोके कुणाचे?
नागपूर, ता. २३ ः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत महाविकास आघाडीचे ११ पैकी १० उमेदवार पराभूत झाले. खुल्या प्रवर्गात पाच जागा असताना सहा उमेदवार उभे करण्याचे डोके कुणाचे असा सवाल आता पराभूत उमेदवार उपस्थित करीत आहेत.
नागपूर विभागीय पदवीधर, नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपला रोखण्यासाठी एकजुटीने निवडणूक लढली होती. त्यामुळे ॲड. अभिजित वंजारी आणि सुधाकर अडबाले आमदार होऊन विधान परिषदेत दाखल झाले. त्या तुलनेत अतिशय छोट्या असलेल्या निवडणुकीत या नेत्यांना आघाडीची किमया साधता आली नाही यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अभिजित वंजारी आणि बबनराव तायवाडे आघाडीचे नेते आहेत. त्यांनीच सर्व नियोजन केले होते. दोघांनीही यापूर्वी अनेकदा विद्यापीठाच्या निवडणुका लढल्या आहेत. त्यामुळे कुठे घात होतो आणि विभाजन कसे होते याचा त्यांना अंदाज नव्हता यावर कोणाचा विश्वास नाही. तायवाडे सरांनी अनेक वर्षे अकाऊंटचे क्लासेस घेतले. असे असतानाही त्यांची आकडेमोड कशी काय चुकली, हे समजायला मार्ग नाही.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची सर्वाधिक महाविद्यालये विदर्भात आहेत. यावेळी ठाकरे यांची शिवसेनासुद्धा सोबत होती. सेनेने सुमारे १० हजार सदस्य नोंदणी केली होती. त्या भरोशावर किमान ५० टक्के जागा महाविकास आघाडीला सहज जिंकता आल्या असत्या. मात्र मनमोहन बाजेपेयी यांचा अपवाद वगळता एकाही उमेदवाराला विजयी पताका फडकवित आली नाही.
बाजपेयी यांना आघाडीच्या नेत्यांसोबत असलेल्या मैत्रीचा थोडाफार फायदा झाला. ‘मेडिकल’ चौकातील कनेक्शन त्यांच्या पथ्यावर पडले. ते थोडक्यात बचावले, अन्यथा त्यांच्यावरही पराभवाची नामुष्की ओढावली असती. ठाकरे सेनेने पॅनेल व्होटिंग केले नसते तर बाजपेयी यांचा पराभव निश्चित होता.