esakal | corona positive story : एचआरसीटी स्कोअर १८ तर ऑक्सिजन लेव्हल ८२ मग झाला पुनर्जन्म
sakal

बोलून बातमी शोधा

corona positive story : एचआरसीटी स्कोअर १८ तर ऑक्सिजन लेव्हल ८२; मग झाला पुनर्जन्म

corona positive story : एचआरसीटी स्कोअर १८ तर ऑक्सिजन लेव्हल ८२; मग झाला पुनर्जन्म

sakal_logo
By
नरेंद्र चोरे

नागपूर : एचआरसीटी स्कोअर (corona HRCT score) १८ तर ऑक्सिजन लेव्हल (Oxygen level) ८२ पर्यंत खाली आलेली. श्वास घेणेही कठीण झाले होते. जीव वाचेल की नाही, अशी शक्यता निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून रवींद्र भुसारी यांचे प्राण वाचविले. प्रबळ इच्छाशक्ती, औषधोपचार आणि कुटुंबीयांचे प्रयत्नांमुळेच पुनर्जन्म झाल्याची भावना भुसारी यांनी व्यक्त केली. (Ravindra Bhusari from Nagpur struggled with Corona for twelve days)

नागपूर आकाशवाणीमध्ये वरिष्ठ उद्घोषक म्हणून कार्यरत असलेले भुसारी यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. सुरुवातीला घशात खवखव व ताप आल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आरटीपीसीआर चाचणी करवून घेतली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ‘होम क्वारंटाईन’ होऊन घरी उपचार सुरू केले. तीन दिवस होऊनही ताप कमी होत नव्हता. ऑक्सिजन लेव्हल दिवसेंदिवस खाली येत होती. त्यामुळे घरच्यांनी हॉस्पिटलमध्ये भरती करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे जावई ॲड. संदेश सिंगलकर यांच्या ओळखीमुळे धंतोलीतील डॉ. माहूरकर यांच्या अवंती हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. त्यांना तिथेही दोन दिवस श्वास घ्यायला खूप त्रास गेला. टॉयलेटमध्ये चक्कर येऊन ते पडलेही. त्यामुळे भुसारी यांना लगेच आयसीयूत शिफ्ट करण्यात आले.

हेही वाचा: कोरोना काळात तत्काळ पैसे हवेत? जाणून घ्या, बचत खात्यातून कसे काढायचे पैसे

भुसारी म्हणाले, आयसीयूमध्येही सुरुवातीला दोन-तीन दिवस सिरियस कंडिशनमध्ये होतो. मोबाईलचे बटन दाबणेसुद्धा जमत नव्हते. घरचा संपर्क तुटल्याने तिकडे पत्नी व मुलगीही खूप टेंशनमध्ये होते. त्याचवेळी अधूनमधून आजूबाजूचे पेशंट मरण पावल्याने आणखीनच भीती वाटत होती. माझी एकूणच अवस्था पाहून डॉक्टरांनी घरी फोन करून पुढचे दोन दिवस खूप ‘क्रिटिकल’ असल्याचे सांगितले.

जीव धोक्यात असल्याचे पाहून पत्नी राजश्री व मुलगी जुईलीने अक्षरशः देवाचा धावा केला. अखेर दोन दिवसांनंतर माझ्या प्रकृतीत सुधारणा होऊन हळूहळू जीवघेण्या संकटातून बाहेर पडलो. यादरम्यान त्यांना सहा रेमेडेसिव्हिर इंजेक्शन्स लागले. डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न आणि कुटुंबीय, मित्र, नातेवाईक व आकाशवाणीतील सहकाऱ्यांच्या पाठीशी असलेल्या शुभेच्छांमुळेच मी कोरोनाविरुद्धची लढाई जिंकू शकलो, अशा शब्दांत ५८ वर्षीय भुसारी यांनी भावना व्यक्त केल्या.

हेही वाचा: विदर्भात १५ जूनपर्यंत मॉन्सून धडकणार? हवामान विभागातर्फे संकेत

दोन आठवड्यांचा संक्रमण काळ माझ्यासाठी भयानक अनुभव होता. हे दिवस मी आयुष्यात कदापि विसरू शकत नाही. अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून बाहेर आलो. सुदैवाने डॉक्टरांचे अथक प्रयत्न आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यात यशस्वी ठरलो. आतापर्यंत केलेली समाजसेवा व पुण्यकर्माचे हे फळ होते.
- रवींद्र भुसारी

(Ravindra Bhusari from Nagpur struggled with Corona for twelve days)