खाकी वर्दीत दिसली माणुसकी; रिक्षाचालकाच्या डोळ्यात तर पाणी आलेच शिवाय बघ्यांनाही गहिवरून आले

The rickshaw puller was also shocked by the humanity in the police
The rickshaw puller was also shocked by the humanity in the police

नागपूर : पोलिस... हे नाव उच्चारताच सर्वसामान्य नागरिकांना घाम सुटायला लगतो... कोण पोलिसांच्या वाटी जाणार... त्यांच्यापासून दोन हात दूर राहिलेलेच बरं असे म्हणत अनेकजण पोलिस ठाण्याची पायरी चढण्याचे चाळतात. पोलिस म्हणजे रुबाबदार, दरारा, गुंडांना झोडपून काढणारे मग आपला काय टिकाव लागणार असा सर्वसामान्यांचा समज झाला आहे. वाईट काम करायचे नाही आणि पोलिसांना घरापर्यंत येऊ द्यायचे नाही, असा चांगल्या लोकांचा प्रयत्न असतो. मात्र, खाकी वर्दीतही चांगला माणूस असतो, याचा विसर नागरिकांना पडत आहे. पोलिसांच्या माणुसकीचे उदाहरण लॉकडाऊन दरम्यान पाहायला मिळाले.

कोरोनाचा देशात शिरकाव झाला आणि लॉकडाउन लावण्याची वेळ सरकारवर आली. लॉकडाऊनमुळे अनेकांचे व्यवसाय बंद पडले. अनेकांच्या हातचे काम गेले. लॉकडाउमुळे हातावर कमावून पोटावर खाणाऱ्यांचे अतोनात हाल झाले आणि आताही होत आहेत. त्यातून रिक्षाचालकही काही सुटलेले नाहीत. मागच्या वर्षी मार्च महिन्यात लॉकडाउन करण्यात आले होते. यावर्षीही हिच परिस्थिती कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागपुरात ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने लॉकडाउनची घोषणा केली. त्यानुसार पोलिस आयुक्तालयातील हद्दीत लॉकडाउन सुरू झाले. सकाळपासूनच चौकाचौकांत बॅरिकेट्स लावण्यात आले. ये-जा करणाऱ्यांची तपासणी तर विनाकारण फिरणाऱ्यांची परेड सुरू झाली. हा प्रकार सुरू असताना एक वृद्ध रिक्षा ओढताना तैनात असलेल्या प्रफुल्ल बोंदरे आणि कृष्णा दराडे नामक पोलिसांना दिसला.

कदाचित लॉकडाउनमुळे त्यांना सवारी मिळाली नव्हती आणि त्यामुळेच कमाईसुद्धा झाली नव्हती. हताश होऊन ते रिक्षाचालक खाली पाहत, रिक्षा ओढत जात होता. त्यांच्या चेहऱ्यायावरील निराशा पोलिसांनी ओळखली. रिक्षाचालकाजवळ ते दोघे गेले. पोलिस जवळ आल्याचे पाहून ते थोडे बिथरला. परंतु, त्यांनी आस्थेने विचारपूस केल्याने थोडे सावरले. सवारी न मिळाल्याने कमाई झाली नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांनी वृद्ध रिक्षाचालकाला मदतीचा हात समोर केला. पोलिसांच्या त्या मदतीने रिक्षाचालकाच्या डोळ्यात तर पाणी आलेच शिवाय बघ्यांनाही गहिवरून टाकले.

वर्दीतील माणुसकी अनेकांनी अनुभवली

लॉकडाउनच्या काळातही पोलिस रिक्षाचालकावर कारवाई करीत असल्याचे पाहून नागरिक पोलिसांचा राग करीत होते. मात्र, चित्र काही वेगळेच होते. दोन्ही पोलिस कारवाईच्या उद्देशाने नाही तर मदतीच्या भावनेतून त्या वृद्ध रिक्षाचालकाजवळ गेले होते. त्यांनी रिक्षाचालकाची आस्थेने विचारपूस केल्यानंतर १०० रुपयांची मदत केली. सुरुवातीला रिक्षाचालकाने पैसे घेण्यास नकार दिला. मात्र, पोलिसांनी विश्‍वासात घेतल्यानंतर त्यांनी मदत स्वीकारली व हात जोडले. मात्र, पैसे घेतेवेळी रिक्षाचालकाचे डोळे डबडबले. पोलिसांचा हा चेहरा पाहून बघ्यांनाही गहिवरून आले. लॉकडाउनच्या या परिस्थितीत वर्दीतील माणुसकी अनेकांनी अनुभवली होती.

गहिवरून टाकणारा परिचय रिक्षाचालकाला आला

पोलिस म्हटलं की सर्वसामान्यांच्या मनात उभी राहते ती खाकी वर्दीतील तापट स्वभावाची, कडक शब्दांत बोलणारी, हेकेखोर, असंवेदनशील व्यक्‍तीची प्रतिमा. त्यामुळे पोलिसांबद्दल अनेकांच्या मनात भीती असते. असा हा पोलिस कर्तव्याच्या वेळी जितका कठोर असतो तितकाच वेळप्रसंगी मनाने मृदूही असतो, याचा गहिवरून टाकणारा परिचय रिक्षाचालकाला आला.

संकलन आणि संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com