esakal | कोळशाच्या किमती वाढल्याने लघू उद्योगांना लागणार टाळे? । Coal
sakal

बोलून बातमी शोधा

कोळशाच्या किमती वाढल्याने लघू उद्योगांना लागणार टाळे?

कोळशाच्या किमती वाढल्याने लघू उद्योगांना लागणार टाळे?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : विदेशातून येणाऱ्या कोळशाच्या किमतीत वाढ झाल्याने उद्योजक घरगुती कोळशाकडे वळले आहे. त्यामुळे ई-ऑक्शनमध्ये कोळशाच्या किमतीत अचानकच मोठी वाढ झालेली आहे. त्यामुळे लहान उद्योग अडचणीत आले असून अनेक उद्योगांना टाळे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोळशाच्या किमतीत गेल्या तीन महिन्यात तीन हजार रुपये प्रति टन वाढ झाली. स्टील रोलिंग मिल्सला वाढीव किमतीत माल विक्री करण्यात मोठ्या अडचणीचे ठरत असल्याने त्यांनी उत्पादनात घट केली आहे. तीन महिन्यांपूर्वीपर्यंत आयात केलेला कोळसा गुजरात बंदरात आठ ते नऊ हजार प्रति टन मिळत होता. परंतु आता त्याची किंमत १२ हजार रुपये प्रति टनापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे वेकोलिच्या ई-ऑक्शनमध्ये कोळशाची किंमत ५ हजार ते साडेपाच हजारांवरून आठ ते साडेआठ हजार रुपये प्रति टनाच्या स्तरावर पोहोचली आहे. लघुउद्योगांना वाढीव किमतीत कोळसा घेणे कठीण जात आहे. त्याचा थेट परिणाम कारखान्याच्या संचालनावर पडत आहे.

लिंकेजमध्ये १२५ उद्योग

वेकोलिसोबत कोळसा लिंकेजमध्ये जवळपास १२५ उद्योगांचा करार आहे. त्यांना सुमारे साडे तीन ते चार हजार रुपये प्रति टन कोळसा मिळतो. परंतु खाणींमध्ये पाणी साचल्याचे कारण पुढे करून कोळसा उपलब्ध केला जात नाही. त्यामुळे लिंकेजधारकही त्रस्त झाले आहेत. प्रामुख्याने स्टील, पॉवर व टेक्स्टाईल्स सेक्टरमधील उद्योगांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.

"वेकोलि तीन महिन्यांपूर्वीपर्यंत प्रत्येक महिन्याला जवळपास पाच लाख टन कोळशाचा लिलाव करीत होते. तेवढी उद्योगांची गरज होती. परंतु, गेल्या तीन महिन्यात ई-ऑक्शनद्वारे कोटा कमी करून सुमारे ३.५ लाख टन केला. त्यामुळे उद्योगांमध्ये कोळशावरून स्पर्धा रंगली आहे. त्यातूनच किमतीही वाढत आहे." पंकज बक्षी, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन.

loading image
go to top