esakal | तीन हजार मुलींचा बाप अखेर कोसळला..पोरके करून गेला
sakal

बोलून बातमी शोधा

Sad demise of Father of three thousands girl childs

तीन हजार मुलींचा एक बाप कसा असू शकतो? हा प्रश्‍न नक्कीच पडला असेल. परंतु आहेच तो तीन हजार मुलींचा बाप. बापाच्या मायेने वाढविणारा. त्यांना हक्काने शिकविणारा. केवळ शिकविणारा नव्हे, तर पदवीपर्यंतचे शिक्षण अधिकाराने देणारा. केवळ अधिकारानेच देणारा नव्हे, तर पित्याच्या धाकाने पदवीपर्यंतचे शिक्षण बंधनकारक करणारा. "माझी प्रत्येक मुलगी शिकली पाहिजे. स्वावलंबी झाली पाहिजे', असे पोटतिडकीने सांगणारा हा बाप. आज तो कोसळला, तेव्हा हजारो मुलींना पोरके करून गेला. हा बाप आहे सावरगाव या गावातला.

तीन हजार मुलींचा बाप अखेर कोसळला..पोरके करून गेला

sakal_logo
By
प्रमोद काळबांडे

नागपूर : सावरगाव... नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्‍यातील एक समृद्ध असलेले गाव. आज या गावाची लोकसंख्या दहा हजाराच्यावर आहे. आज या गावातील 99 टक्के मुली पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या दिसतील. परंतु अशी स्थिती आधी नव्हतीच. 1990 पूर्वीपर्यंत या गावात एकच माध्यमिक विद्यालय होते. तिथे दहावीपर्यंतचे वर्ग होते. नाडेकर विद्यालय असे त्याचे नाव... आणि दहावीपुढील शिक्षणाचे प्रमाण होते केवळ एक किंवा दोन टक्के.

गावातील पालक आपल्या-मुला-मुलींना नाडेकर विद्यालयात दाखल करायचे. गावात बहुतेक शेतकरी. शेती करुन उदरनिर्वाह करणारे. त्यामुळे मुलींना शाळेत टाकले तरी, शेतीच्या हंगामात बहुतेक सर्व मुली शेतीत काम करायला जायच्या. सावरगावपासून तालुक्‍याची दोन ठिकाणे होती. नरखेड आणि काटोल. दोन्हीही शहरे प्रत्येकी पंधरा किलोमीटर अंतरावर. मुली शेतीत जात असल्यामुळे त्यांचे दहावी कसे-बसे होई. परंतु दहावीनंतर सावरगाव येथे शिकण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती.

हेही वाचा - नागपुरात प्रीती दासचा धुमाकूळ, वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारी

सावरगावच्या नाडेकर शाळेतून दहावी नापास झालेल्या मुली मग घरी बसायच्या. काही मुली "सतरा' नंबरचा फॉर्म भरून परीक्षा द्यायच्या. तर, अनेक मुलींच्या कपाळावर "दहावी नापास' असा ठपका लागायचा. त्यांचे आई-वडील मग त्यांच्या लग्नाची घाई करुन जबाबदारीतून मोकळे व्हायचे. परंतु आपल्या मुलींना दहावीपुढील शिक्षण देण्याची हिंमत किती मुलींच्या आई-वडीलांमध्ये असायची?, या प्रश्‍नाचे उत्तर खूपच दया वाटावी, असेच होते.

नाडेकर विद्यालयातून दहावी पास झालेल्या 100 एक मुलींमधून केवळ एक किंवा दोन मुलींना त्यांचे आई-वडील पुढील शिक्षणासाठी नरखेड येथील पंढरीनाथ महाविद्यालय किंवा मुंदाफळे महाविद्यालयात दाखल करत. काही आई-वडील काटोल येथील बनारसिदास रुईया महाविद्यालय किंवा नबीरा महाविद्यालयामध्ये दाखल करत. त्यामुळे 1990 पूर्वी या गावातील दहावीपुढील मुलींचे शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प असायचे. मुलींना न शिकविण्याचे कारण होते तरी काय? ते अगदीच विचित्र वाटावे असे होते.

क्लिक करा - धोका वाढला, एकाच कुटुंबातील 12 जण पॉझिटिव्ह; एक वर्षीय चिमुकलाही सुटला नाही...

मुलींना न शिकविण्याचे विचित्र कारण

काटोल किंवा नरखेडला मुलगी शिकायला पाठवायची म्हणजे तिच्या प्रवासाचा मोठा प्रश्‍न आला. प्रवासासाठी दरमहा पासचा खर्च सर्वच आई-वडीलांना परवडनारा नव्हता. ज्यांना परवडणारा होता, त्यांना आपल्या मुलींना बसमध्ये प्रवास करून तालुक्‍याला पाठवायचे नव्हते. कारण बसच्या प्रवासात टारगट मुलांच्या तावडीत आपली मुलगी पडली आणि पुढे आपल्या कुटुंबाला कलंक लागला तर? असाही विचार अनेक आई-वडील करायचे. मुलगी शिकून करणार तरी काय? अशीही एक मानसिकता त्यामागे होती. परंतु ही परिस्थिती अचानक बदलली. बदलली नव्हे तर एका द्रष्ट्या माणसाने ती बदलविली.

सोनुबाबा नावाचा एक द्रष्टा

तो द्रष्टा होता सुनील शिंदे. सावरगाव येथीलच नव्हे तर पंचक्रोशीतील लोक त्यांना प्रेमाने "सोनुबाबा' म्हणायचे. या द्रष्ट्या माणसाच्या लक्षात गावातील मुलींच्या शिक्षणाची ही दशा आली...आणि त्यांनी एक निर्णय घेतला. या मुलींच्या शिक्षणासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे. यांना शिकविले पाहिजे हा निर्धार केला. मग त्याने 1990 मध्ये शिंदे शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. गावातच शाळा सुरू केली. केवळ दहावीपर्यंतचे नव्हे तर, 11 वी, 12 वी आणि पदवीपर्यंतचे वर्ग सुरू केले....आणि मग गावातच नव्हे तर पंचक्रोशीत चमत्कार झाला.

 जाणून घ्या - नागपुरमध्ये पॉश फ्लॅटमधील सेक्‍स रॅकेटवर छापा

प्रत्येक विद्यार्थीनी माझी मुलगीच

गावातील मुली शिकू लागल्या. गावातीलच नव्हे, तर पंचक्रोशीतील जी गावे होती, त्या गावांतील मुलींचेही प्रवेश व्हायला लागले. "सोनुबाबा'ने शाळा महाविद्यालयचे नावही अफलातून ठेवले. "राणी लक्ष्मीबाई कन्या महाविद्यालय'. ""माझी प्रत्येक मुलगी राणी लक्ष्मीबाईसारखी जीवनच्या प्रत्येक क्षेत्रात लढवय्यी झाली पाहिजे'', असा निर्धार ते बोलून दाखवायचे. हो...त्यांच्या संस्थेत शिकणाऱ्या प्रत्येक मुलीला ते स्वतःची मुलगी मानायचे.

मुलींच्या शिक्षणाचा भगीरथ

मग बघता-बघता पंचक्रोशीतील सावरगाव, मालापूर, येनीकोनी, मसोरा, सिंदी-उमरी, मन्नाथखेडी आदी अनेक गावांतील पालक आपल्या मुलींना सोनुबाबांकडे शिक्षणासाठी सोपवून द्यायला लागले. सोनुबाबांची शिस्तही कमालीची होती. त्यांच्या शाळेत मुलगी दाखल केली की, ती शाळेत तर सुरक्षित असेल याची खात्री होतीच. परंतु ती घरीही सुरक्षित येईलच, याचीही हमी होती. मुलींच्या बाबतीत सोनुबाबांचा धाकच असा होती की, त्यांच्या शाळेतील कोणत्याही मुलींना कधीही कुणी छेडण्याची हिंमत करायचे नाही. ग्रामीण भागात मुलींच्या शिक्षणाची गंगा आणणारा हा शिक्षणाचा भगीरथ अखेर आज कोसळला.

अधिक माहितीसाठी - पप्पा गेल्यामुळे मला जीवनात रस राहिला नाही, मी पण जाते...

...मुलींमध्ये आत्मविश्‍वास पेरतच राहील

गुरुवारी सकाळी 10 वाजता सोनुबाबा त्यांच्या शाळेतील त्यांच्या हजारो मुलींना पोरके करून गेले. 1990 पासून आजवर त्यांच्या शाळेत शिकलेल्या मुलींची संख्या हजारो नव्हे तर, लाखाच्या घरात आहे. ज्या भागातील दहावीनंतर शिक्षणाचे प्रमाण केवळ एक किंवा दोन टक्के होते, तेथील शिक्षणाचे प्रमाण 99 टक्केवर नेणाऱ्या या शिक्षणमहर्षीने अखेर गुरुवार 11 जून 2020 रोजी सावरगाव येथे प्राण ठेवला. त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी उभारलेली संस्था मात्र यापुढेही हजारो मुलींच्या आयुष्यात राणी लक्ष्मीबाई यांच्यासारखा आत्मविश्‍वास रुजविण्याचे काम यापुढेही करत राहील...

loading image