खुशखबर! संक्रांतीला वाढणार तीळगुळाचा गोडवा; दरात ४० रुपयांपर्यंत झाली घट

Sesame price reduced in Nagpur
Sesame price reduced in Nagpur

नागपूर : गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा तिळाचे भाव प्रति किलो ३० ते ४० रुपयांनी घटले आहे. विशेष म्हणजे यावर्षी उत्पादन चांगले असल्याने तीळ आणि गुळाचाही गोडवा वाढणार आहे, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्र वगळता राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेशात तिळाचे उत्पादन चांगले झाल्याने तिळाचे दर गेल्यावर्षांच्या तुलनेत कमी आहेत. परिणामी, संक्रांतीला तिळगुळासह तिळाचे पदार्थ स्वस्त होण्याची शक्यता आहे. दोन वर्षांपासून पावसाने चांगली हजेरी लावल्याने उसाचे क्षेत्र वाढले आहे. गुऱ्हाळ सुरू झाल्याने गुळाचे उत्पादन वाढले असून, भाव स्थिरावले आहेत. संक्रांत अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे तिळाला मागणी वाढली आहे.

संक्रांतीला ‘तिळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणताना तिळाच्या वड्या, पापडी, तिळगूळ आदी पदार्थ देण्याची प्रथा आहे. त्यामुळे तिळाला विशेष महत्त्व आहे. राज्यात लातूर, खानदेश भागात यंदा तिळाचे कमी उत्पादन झाले.

त्या तुलनेत राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात येथे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पांढऱ्या तिळाचे उत्पादन चांगले असून, लाल तिळाचे उत्पादन थोडे कमी आहे. तरीही गेल्या दोन वर्षीच्या तिळाचे दर तुलनेत कमी झालेले आहेत.

मागील वर्षी १८० ते २०० रुपये किलो असलेली तीळ यंदा १२५ ते १४० रुपये मिळत आहे. लाल तीळ २०० ते १९० रुपये होती. त्यात घसरण होऊन १६० ते १७० रुपये दर झालेला आहे. यंदा निर्यात देखील कमी आहे. त्यामुळे तीळ स्वस्त झाल्याने संक्रांतीला तिळाची पापडी, तिळाची वडी, रेवडी, तिळगूळ गजक सारखे गोड पदार्थ स्वस्त मिळतील, अशी माहिती तिळाचे व्यापारी अनिल नागपाल यांनी दिली.

गुजरातमधून तेलाची आवक

संक्रांतीला तिळाबरोबर गुळाला देखील मागणी आहे. गूळ प्रति किलो ४० ते ६० रुपये झालेला आहे. गतवर्षीच्या तुलनेत स्थिरावलेले आहेत. गुळाच्या बॉक्स, चिक्की गुळाची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. आठवडाभर गुळाला मागणी असल्याने दर तेजीत राहतील. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून अनेक शेतकरी घरगुती आणि विक्रीच्या दृष्टीने तिळाचे उत्पादन घेतात. गावरान तिळाला चांगली मागणी असते. गुजरातमधून तेलाची आवकही सुरू झालेली आहे, असे नागपाल म्हणाले.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com