esakal | मुलाचा कोरोनानं मृत्यू झाल्याचं कळताच आईनेही सोडला जीव, गावात स्मशान शांतता

बोलून बातमी शोधा

corona death
मुलाचा कोरोनानं मृत्यू झाल्याचं कळताच आईनेही सोडला जीव, गावात स्मशान शांतता
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चांपा (जि. नागपूर) : वेळेवर योग्य उपचार मिळत नसल्याने उमरेड तालुक्यातील मांगली, परसोडी, हळदगाव, उटी, वडद, मटकाझरी, चिमणाझरी, पेंढरी येथे कोरोनामुळे (corona) अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. अनेकांनी आपला जीव गमावला. अशीच घटना मांगली येथे घडली. कोरोनावर वेळीच उपचार न मिळाल्याने समीर शेख (वय२८, मांगली) सोबतच भाऊ अमीर शेख दोघेही कोरोनाग्रस्त (corona positive) असल्याने त्यांच्यावर नागपूर येथील शासकीय रुग्णालयात (government medical college nagpur) उपचार सुरू होते. दरम्यान, समीर शेख या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यापाठोपाठ आई साईदा शेख (वय४७) हिने मुलगा गमवल्याने जीव सोडला. अशा अत्यंत दुःखदायक घटना दरदिवशी घडत असल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले. (son and mother died on same day in champa of nagpur)

हेही वाचा: वादळानं पाळण्यातील बाळ १०० फूट उंच उडालं, आईनं फोडला एकच हंबरडा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने नागपुरात हाहाकार माजविला. दरदिवशी सात हजाराच्या घरात रुग्ण सापडताहेत. सर्वत्र मृत्यूचे तांडव सुरू आहे. शहरापाठोपाठ कोरोनाने आता ग्रामीण भागात पाय रोवले आहे. परंतु, डॉक्टरांची कमतरता जाणवत असल्याने रुग्णांवर वेळेत उपचार मिळणे कठीण झाले आहे. काहीजण भीतीपोटी रुग्णालयात जात नसल्याची देखील माहिती आहे.

ग्रामीण भागात डॉक्टरांची कमतरता असल्याने साथरोगात वाढ झाली आहे. ग्रामीण भागातील रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रांवर अवलंबून असतात. सर्दी, खोकला, ताप आल्यास प्राथमिक आरोग्य केंद्राचा आधार घेतात. परंतु, पॉझिटिव्ह रिपोर्ट येईल, या भीतीने नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्यास कुचराई करतात. प्राथमिक आरोग्य केंद्रातून सरळ जिल्ह्याच्या ठिकाणी पाठविले जाते. शिवाय मृत्यू ओढवल्यास नातेवाईकांना मृतदेह मिळत नसल्यामुळे घरी घरगुती उपचार करण्यावर प्राधान्य देतात. सध्या उन्हाळा सुरू आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून नागपूर ग्रामीण भागात वातावरणात सतत बदल होत आहे. ढगाळ वातावरण, हलक्या सरी, पावसानंतर उन्हांचे चटके अशा बदलत्या वातावरणामुळे ग्रामीण भागात 'व्हायरल फ्ल्यू' ने थैमान घातले आहे.

नागपूर व विदर्भातील बातम्या वाचण्यासाठी इथं क्लिक करा

हेही वाचा: उपराजधानीत भडकले गॅंगवॉर; भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी महिलेसह दोघांवर तलवारीने हल्ला

ग्रामीण भागात डॉक्टरांची संख्या अपुरी -

उमरेड ग्रामीण भागात डॉक्टरांची संख्या लोकसंख्येच्या मागे अल्प प्रमाणात असल्यामुळे रुग्णांना वेळेवर औषधोपचार मिळत नाही. शिवाय अशावेळी दवाखान्यात गर्दी वाढलेली आहे. कोरोनाच्या भीतीमुळे डॉक्टर खबरदारी बाळगत आहेत. कोरोनाच्या टेस्टशिवाय उपचार करण्यास तयार होत नाही. ग्रामीण भागात उच्च शिक्षित डॉक्टर वैद्यकीय सेवा देण्यास कुचराई करतात. शिवाय ग्रामीण भागात उच्च शिक्षित डॉक्टर दवाखाने उघडत नाहीत. शहरी भागात वैद्यकीय सेवा देण्यास प्राथमिकता देतात. ग्रामीण भागात डॉक्टरांच्या कमतरतेमुळे वेळेवर उपचार मिळत नसल्यामुळे अनेकांना आपल्या जीवास मुकावे लागले. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.