Nagpur किलोमीटरच्या सक्तीने एसटी तोट्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

S T Bus

Nagpur : किलोमीटरच्या सक्तीने एसटी तोट्यात

नागपूर : उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असल्याने तोट्यातून एसटीला बाहेर काढण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. मात्र, फेऱ्यातील किलोमीटर पूर्ण करण्याच्या नादात प्रवासीच मिळत नसलेल्या मार्गावर रिकाम्या बस घेऊन जात आहेत. परिणामी, बसचे उत्पन्न घटले असून किलोमीटर पूर्ण करण्याच्या सक्तीने एसटी तोट्यात गर्तेत अडकत चालली असल्याचे बोलले जात आहे.

आगारात वेळेवर चालकांना बस उपलब्ध होत नाही. बस सुटण्याची वेळ निघून जाते. प्रवासी वाट पाहतात. पर्यायी मग दुसऱ्या खासगी वाहनांनी जाणे प्रवासी पसंत करतात. चालकांना गाडी उशिरा मिळाल्यानंतरही फेऱ्यातून किलोमीटर पूर्ण करण्यासाठी सक्ती केली जाते. ग्रामीण भागात अशा फेऱ्यातील बसेसना प्रवासी मिळत नाहीत. परिणामी बहुतांश गाड्या रिकाम्या धावतात.

एसटीला एका किलोमीटर मागे ५२ रुपये खर्च येतो. त्यात चालक-वाहकांचा पगार, डिझेलचा खर्च आणि इतर खर्च आहे. एसटी महामंडळाने यापूर्वी २००८ मध्ये परिपत्रक काढून कामगार संघटनेच्या सोबत झालेल्या बैठकीत किलोमीटरची सक्ती न करण्याचे निर्देश दिले होते. यामध्ये चालक-वाहकांना गाडी उशिरा मिळाल्यानंतरही प्रवासी नसताना देखिल केवळ किलोमीटर रद्द होऊ नये म्हणून फेरी करण्याची सक्ती करण्यात येते.

त्यामुळे रिकाम्या गाड्या मार्गस्थ केल्याने महामंडळाचा खर्च वाढतो. त्यातून पुरेसे उत्पन्न मिळत नाही, असे सुचविले होते. मात्र, कोरोना आणि संपामुळे गाड्यांची स्थिती चांगली नाही. त्यामुळे चालकांना वेळेवर गाड्या उपलब्ध होत नाही. नियोजित वेळेअभावी प्रवासी वाट बघून खासगी वाहनांनी जाणे पसंत करतात. तसेच बहुतांश ग्रामीण मार्गावर प्रवासी नसतात. त्यामुळे किलोमीटरच्या सक्तीने रिकाम्या गाड्या धावत असल्याने महामंडळाला आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.

आगारातून वेळेवर गाड्या मिळत नाही. त्यामुळे फेऱ्यांची वेळ निघून गेलेली असते. काही तासांनी गाडी मिळाल्यानंतर किलोमीटर रद्द होऊ नये म्हणून फेऱ्या करायला लावतात. मात्र, अशावेळी गाड्यात प्रवासीच मिळत नाही. परिणामी गाडी रिकामी धावून अपेक्षित उत्पन्न होत नाही.

-चालक व वाहक, एसटी महामंडळ

बस निघताना स्थानकावर प्रवासी मिळाले नाही तर परत येताना मिळतात. मात्र, अशा काही फेऱ्या ठरलेल्या आहेत त्या प्रवासी नाही मिळाल्या तरी पूर्ण कराव्या लागतात. त्या रद्द करता येत नाही. मात्र, यात किलोमीटरची सक्ती नाही.

- किशोर आदमने,

प्रभारी विभाग नियंत्रक