Nagpur News | सोडून द्या हो त्याला, तो माझा नवराच आहे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

acid

सोडून द्या हो त्याला, तो माझा नवराच आहे!

नागपूर : तीन वर्षांपासून सुरू असलेल्या कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर ॲसिडसदृश द्रव्य टाकून हल्ला केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे घटना कळताच पतीला अटक केली. आता पती कारागृहात आहे. परंतु ॲसिड हल्ला झालेल्या पत्नीच्या काळजाला पाझर फुटला. आता ही महिला पतीला सोडविण्यासाठी पोलिस स्टेशनचे उंबरठे झिजवत असून, ‘सोडून द्या हो त्याला, तो माझा नवराच आहे’, असे आर्जव पोलिसांना घालत असल्याची माहिती पुढे आली.

हेही वाचा: दहावी-बारावीसाठी शाळा तिथे परीक्षा केंद्र! एका वर्गात 25 विद्यार्थी

अनेकदा क्षुल्लक कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद होतात. त्याची परिणती वादात होऊन ते विकोपाला जातात. असाच काहीसा प्रकार सुरेश झेंगटे (४२) आणि त्यांच्या पत्नीदरम्यान घडल्याचे दिसून येते. तीन वर्षांपासून सुरेशचा पत्नीसोबद वाद सुरू होता. सततच्या वादामुळे ते विभक्त झाले. पोटाची खळगी भरण्यासाठी पत्नीने पोळ्या लाटण्याचे काम सुरू केले. त्यांना १२ वर्षांची मुलगी आणि दहा वर्षांचा मुलगा आहे. काही दिवसांपूर्वी सकाळी सायकलने पोळ्या करण्याच्या कामासाठी जात असताना सुरेशने तिच्या चेहऱ्यावर ग्लासमध्ये भरून आणलेले ॲसिडसदृश्‍य द्रव्य फेकले आणि फरार झाला.

हेही वाचा: दापोलीतील उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरणार; राजेश टोपे

जखमी पत्नीला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, फेकण्यात आलेले द्रव्य प्रभावी नसल्याने पत्नीच्या चेहऱ्याला कुठलीही इजा झाली नाही. मात्र, करण्यात आलेले कृत्य गंभीर असल्याने पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर सुरेशला अटक केली. त्याची पोलिस कोठडीतही रवानगी करण्यात आली. मात्र, काहीच दिवसांत पत्नीचे पती प्रेम जागृत झाले. तिने थेट पोलिस स्टेशन गाठून पतीला सोडण्याची गळ घातली. त्यासाठी ती दररोज पोलिस ठाण्यात येत असल्याचे समजते. मात्र, प्रकरण गंभीर असल्याने असे करता येणे अशक्य असल्याने पोलिस तिची समजूत काढून त्यांचा गुन्हा कायम ठेवण्यास मनधरणी करीत असल्याचे समजते.

मुलांमुळे गळ घातल्याची शंका

सुरेश झेंगटे यांना १२ वर्षांची मुलगी आणि १ वर्षाचा मुलगा आहे. दोघेही विभक्त झाल्याने त्याचा परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, आता हे प्रकरण घडल्याने अजूनच गंभीर प्रश्‍न निर्माण झाल्याने पत्नीने पतीला सोडून देण्याची गळ घातली असल्याची शक्यता पोलिस व्यक्त करीत आहेत.

Web Title: Starting Three Years Family Dispute Husband Attacks Wife By Throwing Acid

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top