Nagpur News : डीपीसीत मुख्यमंत्री शिंदे गटाला ठेंगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis

Nagpur News : डीपीसीत मुख्यमंत्री शिंदे गटाला ठेंगा

नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा नियोजन समिती जाहीर केली असून, यात मुख्यमंत्री शिंदे गटाच्या एकाही कार्यकर्त्याचा समावेश केलेला नाही. त्याचा सर्वाधिक आनंद उद्धव ठाकरे यांच्या गटालाच झाला.

शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जयस्वाल त्यांच्यासोबत गेले आहेत. त्यामुळे या दोघांच्या कार्यकर्त्यांना नियोजन समितीत सामावून बळ दिले जाईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, प्रत्यक्षात उलटे घडले. जिल्ह्याचे खासदार या नात्याने कृपाल तुमाने या समितीत पदसिद्ध सदस्य आहेत. एवढाच शिंदे गटाला दिलासा मिळाला आहे. समितीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. राजीव पोतदार, चरणसिंग ठाकूर, सुधीर पारवे, संदीप जाधव, अशोक धोटे, सुधाकर मेंघर, सदानंद निमकर, अजय बोढारे, उकेश चव्हाण, रूपराव शिंगणे, विनायक डेहनकर, विकास बुधे, योगेंद्र शाहू, अविनाश ठाकरे, प्रभाकर येवले, पिंटू झलके, अनिरुद्ध पालकर आदींचा समावेश आहे.

सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांची कुठल्यातर शासकीय समितीवर निवड व्हावी अशी अपेक्षा असते. ज्या पक्षाची राज्यात सत्ता त्याच पक्षाचे कार्यकर्ते समितीवर नियुक्त केले जातात. महाविकास आघाडीची सत्ता असताना वर्षभर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची यादीत निश्चित होत नव्हती. त्यामुळे पालकमंत्री नितीन राऊत आणि माजी मंत्री सुनील केदार आपल्या कार्यकर्त्यांची नियुक्ती करून मोकळे झाले होते. राष्ट्रवादीकडे दीड वर्षे संपर्क मंत्रीच नव्हते. त्यानंतर दिलीप वळसे पाटील यांच्याकडे नागपूरचे संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र, त्यांनी राष्ट्रवादीची नावे पालकमंत्र्यांकडे सोपवली नव्हती. अडीच वर्षे सत्ता असतानाही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जिल्ह्यातील एकाही कार्यकर्त्याला समिती दिली नसल्याची खदखद अद्याप व्यक्त केली जात आहे.

नाराजी निर्माण होऊ नये म्हणून दक्षता

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांचा झटपट समावेश करून महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाराजी निर्माण होऊ नये याची दक्षता घेतल्याचे दिसून येते. सोबतच फडणवीस यांनी शहर आणि ग्रामीण कार्यकर्त्यांना समितीत घेऊन संतुलन साधल्याचे दिसून येते.