Nagpur Temperature : ४५ डिग्री तापमानात पोटासाठी संघर्ष! शेतकरी विकतात फूटपाथवर आंबे

गेल्या काही दिवसांपासून शहरात नवतपाचा कहर सुरू आहे. तापमानाचा पारा सध्या ४४-४५ डिग्रीवर आहे. त्यामुळे उष्माघाताचे मृत्यू वाढले आहेत.
farmer mango selling on footpath
farmer mango selling on footpathsakal

नागपूर - गेल्या काही दिवसांपासून शहरात नवतपाचा कहर सुरू आहे. तापमानाचा पारा सध्या ४४-४५ डिग्रीवर आहे. त्यामुळे उष्माघाताचे मृत्यू वाढले आहेत. उन्हामुळे सध्या सारेच जण त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत उन्हाची पर्वा न करता आजूबाजूच्या खेड्यांमधील गोरगरीब शेतकरी शहरातील फूटपाथवर गावरान आंबे विकत आहेत. पोटासाठी संघर्ष करीत असलेल्या या शेतकऱ्यांना आपल्या प्राणाचीही पर्वा नाही.

सध्या आंब्याचा सीझन आहे. त्यामुळे शहरालगतच्या अनेक गावांतील शेतकरी चांगल्या कमाईच्या उद्देशाने फूटपाथवर दुकाने थाटून गावरान आंबे विकत आहेत. कळमेश्वर, धापेवाडा, येरला, गोधनी, बोखारा, भारसवाडा, सावनेर, देवलापार, कन्हान, मोहगाव झिल्पीपासून नरखेडपर्यंतचे अनेक शेतकरी दररोज सायकल, दुचाकी तसेच चारचाकीने पायपीट करत सकाळपासून रात्री उशिरापर्यंत उन्हातान्हात रस्त्यांवर गावरान आंबे विकताना दिसत आहेत. सिव्हिल लाइन्समधील जपानी गार्डन परिसर सध्या या शेतकऱ्यांचे कमाईचे स्थळ बनले आहे.

शेतकरी मोठ्या झाडाची सावली शोधून तिथेच आपली वाहने लावत व्यवसाय करीत आहेत. सकाळपासून उशिरा रात्रीपर्यंत उन्हातान्हात दिवसभर या ठिकाणी आंबेविक्री सुरू असते. शहरात कॉटन मार्केट आणि कळमना बाजार फळांचे मोठे मार्केट आहे.

मात्र या ठिकाणी दलाली, हमाली, टॅक्स, वाहतूक व अन्य खर्च येत असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यामुळे अनेकांनी फुटपाथवरच आंबे विकण्याचा पर्याय निवडला आहे. शे-दोनशे रुपये अधिक मिळावे, हा यामागचा त्यांचा हेतू असतो.

मात्र पैशाचा हा लोभ एकेदिवशी त्यांच्या जीवावरही बेतू शकतो. कारण, सध्या नवतपाचा काळ सुरू असून पारा दिवसेंदिवस उसळी घेत आहे.

उन्हाचे चटके व गरम झळामुळे उष्माघाताचे प्रमाण वाढत आहे. उन्हामुळे यंदाच्या उन्हाळ्यात आतापर्यंत २० जणांचे बळी गेले आहेत. अशा परिस्थितीत केवळ पोटासाठी बिच्चारे गोरगरीब शेतकरी आपले जीव धोक्यात टाकत आहेत. केवळ आंबेविक्रेते शेतकरीच नव्हे, शहरात इतरही ठिकाणी फळविक्रेते ठिकठिकाणी तंबू ठोकून व्यवसाय करीत आहेत. शेतकऱ्यांप्रमाणेच त्यांच्याही जीवाला तितकाच धोका आहे.

‘मरण लिहिले असेल तर येणारच’

यासंदर्भात मोहगाव झिल्पी येथील आंबेविक्रेते शेतकरी अरुण रवाडे यांना विचारले असता ते म्हणाले, ‘काय करणार साहेब, पोटासाठी हे करणे भाग आहे. आमचा हा रोजचाच धंदा आहे. उन्हाची आम्हाला आता सवयच झाली आहे. तसेही जिथे मरण लिहिले असेल, ते कितीही करून आम्ही टाळू शकत नाही. जीवाची आम्हालाही भीती वाटते, पण त्याला इलाज नाही. जोपर्यंत सर्व आंबे खपत नाही, तोपर्यंत आम्ही घरी जाण्याचा विचारच करू शकत नाही. मग ऊन असो वा पाऊस. अनेकदा आंबे विकता-विकता रात्रही होऊन जाते. त्यामुळे नागपुरात थांबावे लागते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com