esakal | लोकांना जोडत कामे केल्याने गवसला यशाचा मार्ग; सुनीलची वेगळी वाट
sakal

बोलून बातमी शोधा

लोकांना जोडत कामे केल्याने गवसला मार्ग; सुनीलची वेगळी वाट

लोकांना जोडत कामे केल्याने गवसला मार्ग; सुनीलची वेगळी वाट

sakal_logo
By
संदीप गौरखेडे

कोदामेंढी (जि. नागपूर) : मनुष्याने स्वतःचा विचार करण्यासोबतच इतरांचा थोडाजरी विचार केला तर नक्कीच त्याचे भले होते, हाच विचार मनात बाळगून कार्य करणारे सुनील आडगूळकर आज यशस्वी उद्योजक आहेत. गावात सिलिंडर आणण्यासाठी ग्रामस्थांची किती खस्ता खाव्या लागतात हे पाहून त्यंनी गॅस एजन्सी मिळविण्यासाठी प्रयत्न केले. कागदपत्रे जमा केली आणि नशिबाचीही साथ मिळाल्याने ‘सुनील भारत गॅस एजन्सी’ गावात सुरू झाली. कधीही कुणाचे मन न दुखावता काम करीत गेलो, माणसे जोडत गेलो, पत्नीची साथ लाभल्याने यशाचा मार्ग प्रशस्त झाल्याचे सुनील गर्वाने सांगतात.

मौदा तालुक्यातील अरोली येथील सुनील आडगुळकर यांच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच. काहीतरी वेगळे करावे, हा प्रश्न मनाला पडत होता. जिद्द आणि चिकाटी मनात असल्याने मिळेल ते काम ते करायचे. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर आयटीआय (फिटर) केले. त्यानंतर नागपूर एमआयडीसी येथील एका कंपनीत चार, सहा महिने नोकरी केली. परंतु नोकरी मनाला पटत नव्हती. देशसेवेचे प्रेम मनात असल्याने २००१ साली बीएसएफ (सीमा सुरक्षा बल) मध्ये नोकरी मिळाली. पण, मन रमत नव्हते.

हेही वाचा: रात्री पावसाने धो-धो धुतले; शेतीचे झाले तलावात रूपांतर

गावातील मातीशी आणि लोकांशी घट्ट नाते जुळले असल्याने मनाची ओढ गावाकडे होती. दोन महिने देशाच्या सीमेवर सेवा दिली आणि गावाकडे वळलो. शेती आणि औषधाचे दुकान हाच मुख्य व्यवसाय बनला. परंतु त्यापलीकडे आणखी काहीतरी करता यावे, याकडे अधिक कल होता. लोकांशी नाते जोडत गेल्याने नशिबाची साथ मिळत राहिली. पत्नी शिल्पाचे शिक्षण औषधशास्त्रात (डी फार्म) असल्याने तिच्याकडे औषध दुकानाची जबाबदारी सोपविली. तिची वेळोवेळी साथ मिळाल्याने सुनीलच्या हाताला बळ मिळाले.

अरोली येथे भारत पेट्रोलियम कंपनीची गॅस एजन्सी वाटप करण्याबाबत पेपरला जाहिरात वाचली. घरगुती गॅस सिलेंडरकरिता होणारा आटापिटा जवळून पाहिला होता. त्यावेळी सिलेंडरसाठी नागरिकांना रामटेक, कामठीला जावे लागायचे. त्यामुळे भारत गॅस एजन्सीकरिता अर्ज दाखल केला. कंपनीकडे बरेच अर्ज आलेले होते. सर्वसाधारण प्रवर्गाकरिता आणि तेही ईश्वर चिट्ठीने ड्रॉ काढण्यात आला. त्यात सुदैवाने सुनील यांच्या नावाची चिट्ठी निघाली.

‘सुनील भारत गॅस एजन्सी’च्या माध्यमातून जवळपास १६० नागरिकांना घरपोच सिलिंडर पुरविले जाते. गावोगावी दररोज चार गाड्याद्वारे गॅसचा पुरवठा केला जातो. या माध्यमातून दहा ते बारा बेरोजगारांना रोजगार मिळाला. याशिवाय विश्वास सामुदायिक संघाद्वारे तीन एकरमध्ये चारा लागवड करीत असल्याने वर्षाकाठी चांगले उत्पन्न होते. तसेच विश्वास ग्रुपमध्ये सामूहिक गोसंवर्धन व दुग्धशाळा प्रकल्पाचे ते सभासद आहेत. लोकांची मने जिंकल्याने पत्नी शिल्पा आडगुळकर ग्रामपंचायत सदस्य राहिल्या.

loading image
go to top