‘मार्च तो सिर्फ झाँकी हैं, एप्रिल-मे बाकी हैं’; विदर्भात उन्हाची तीव्र लाट | Temperature News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

temperature in Vidarbha is now at 42.9 degrees

‘मार्च तो सिर्फ झाँकी हैं, एप्रिल-मे बाकी हैं’; विदर्भात उन्हाची तीव्र लाट

नागपूर : उन्हाच्या लाटेने विदर्भ होरपळत असून बुधवारी अकोल्याचा पारा ४२.९ अंशावर गेला होता. शहरातही उन्हाची तीव्र लाट जाणवत आहे. उपराजधानीचे तापमान ४०.९ अंशांवर पोहोचले. मार्चमध्येच जर उन्हाचे एवढे चटके बसत असतील तर एप्रिल आणि मे महिन्यात काय स्थिती असेल? त्यामुळे यंदाचा उन्हाळा वैदर्भींची चांगलीच परिक्षा घेणार, अशी चिन्हे दिसत आहेत.

साधारणत : धुळवडीनंतर उन्हाचे तीव्र चटके बसू लागतात. मात्र यंदा निर्धारित वेळेपूर्वीच उन्हाळा तापू लागला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून नागपूरकर हा अनुभव घेताहेत. तापमानात दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत असून, विदर्भातील बहुतेक शहरांमध्ये पारा चाळीशीच्या उंबरठ्यावर किंवा पार गेलेला आहे.

सकाळी आठ-नऊ वाजतापासूनच उन्हाचे चटके जाणवायला सुरवात होते. दुपारनंतर ऊन आणखीनच तीव्र होत जाते. उन्हामुळे एरवी, दुपारी रस्त्यांवर दिसणारी गर्दीही कमी झाली आहे. ऊन व गर्मीमुळे जीव कासावीस होत असून, शरीरातून घामाच्या धारा निघू लागल्या आहेत. त्यामुळे पंख्यांची स्पीड वाढली आहे. कुलर व एसीही सुरू झाले आहेत.

धुळवड उंबरठ्यावर असल्याने तापमानात आणखी वाढ अपेक्षित आहे. हवामान विभागाचा येलो अलर्ट आणि सध्याचे एकूणच वातावरण बघता ‘मार्च तो सिर्फ झाँकी हैं, एप्रिल-मे अभी बाकी हैं’ असे म्हणायला हरकत नाही. हवामान विभागानेही दरवर्षीच्या तुलनेत यंदा कडक उन्हाळा राहणार असल्याचे संकेत दिले आहेत.

शहर तापमान

  • अकोला ४२.९

  • वाशीम ४१.५

  • वर्धा ४१.४

  • अमरावती ४१.०

  • नागपूर ४०.९

  • चंद्रपूर ४०.६

  • ब्रम्हपुरी ४०.६

पाच वर्षांतील सर्वाधिक तापमान

मार्च महिन्याच्या पूर्वार्धातील तापमानाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास बुधवारी नागपुरात नोंद झालेले कमाल तापमान गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक ठरले आहे. २०१८ मध्ये नागपूरचा पारा ३८.८ डिग्री, २०१९ मध्ये ३८.५ डिग्री, २०२० मध्ये ३५ डिग्री आणि २०२१ मध्ये ३८.९ डिग्रीवर गेला होता.

Web Title: Temperature In Vidarbha Is Now At 429 Degrees Still Yellow

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NagpurvidarbhaTemperature
go to top