‘बिन फ्री’च्या नादात शहरच झाले ‘डस्टबिन’ | Nagpur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 ‘बिन फ्री’च्या नादात शहरच झाले ‘डस्टबिन’
बिन फ्रीच्या नादात शहरच झाले डस्टबिन

नागपूर : ‘बिन फ्री’च्या नादात शहरच झाले ‘डस्टबिन’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : घराघरातून कचरा गोळा करणाऱ्या कंपनीचा शहरात प्रवेश झाल्यानंतर महापालिकेने ‘बिन फ्री सिटी’ करण्याचा प्रयत्न केला. परंतु, गेल्या काही वर्षात सफाई कर्मचाऱ्यांची संख्या कमी होत आहे. याशिवाय कचरा गोळा करणाऱ्या कंपन्यांकडील कचरा गाड्यांची संख्या व मनुष्यबळही मालमत्तांच्या तुलनेत अल्प असल्याने नागरिकांना कुठेही डस्टबिन दिसत नलल्याने परिसरतील कोपऱ्यात किंवा कथित कचरा संकलन केंद्रावर कचरा फेकत आहेत. एकूणच ‘बिन फ्री सिटी’च्या नादात शहरच डस्टबिन झाल्याचे चित्र आहे. महापालिका प्रशासनाने कचरामुक्त शहराचे नियोजन करीत रस्त्यावरील डस्टबिन काढून फेकल्या. डस्टबिन नसतील तर लोक कचरा थेट कचरा गोळा करणाऱ्या कचरा वाहनचालकांकडे देतील, अशी धारणा होती. मात्र शहरातील ही कचरा समस्या आजही कायम आहे. काही मोजक्या ठिकाणी नेहमी कचरा पडलेला दिसतो.

हेही वाचा: अकोला : उपसभापतीपदाच्या निवडणुकीत ‘वंचित’ची सरशी

उपराजधानी नागपूरला ‘स्मार्ट’ करण्याचे स्वप्न आहे. परंतु, महापालिका स्वच्छतेच्या बाबतीत उदासीन आहे. कोरोना काळात अनेक नवीन आठवडी बाजार सुरू झाले. व्यंकटेशनगर, रिंग रोडवरील संजय गांधीनगरसह अनेक भागात नवीन बाजार सुरू झाले. महापालिकेकडे सफाई कर्मचाऱ्यांची वानवा आहे. त्यातच नवीन बाजार सुरू झाल्याने त्यांच्यावर तेथील ताणही पडला आहे. अनेकदा नगरसेवकांंना प्रभागातील स्वच्छतेसाठी सफाई कर्मचाऱ्यासाठी झोन आरोग्य अधिकाऱ्याकडे तगादा लावावा लागत आहे. बाजार उठताच पडलेला कचरा सडून रोगराईला आमंत्रण देत आहे.

शहराच्या मुख्य भागाव्यतिरिक्त बाहेरील भाग रहिवासीदृष्ट्या मोठ्या प्रमाणात वाढला. त्या-त्या भागांतील रहिवाशांसाठी आता तेथे आठवडी बाजार भरू लागले आहेत. मात्र, हे बाजार भाजीखरेदी करणार्‍या नागरिकांसाठीच त्रासदायक ठरत आहेत. नागपूर शहरात प्रामुख्याने बेसा-बेलतरोडीवासीयांसाठी बेलतरोडी चौकात सोमवारी, महाल व सक्करदरा येथे बुधवारी, राजीवनगरात हॉटेल रॅडिसनसमोर शनिवारी व जयताळा येथे रविवारी हे बाजार भरतात. मंगळवारी बाजारात तर नेहमीच दुर्गंधी असते. बाजारात १ हजाराहून अधिक विक्रेते असतात. ते नागरिकांना ताजी भाजी तर पुरवतात; मात्र बाजार उठताच तिथे होणारा कचरा स्थानिक नागरिकासाठी डोकेदुखी ठरत आहे. बाजाराच्या ठिकाणी डस्टबिन लावल्यास रस्त्यावरील कचऱ्याची तीव्रता कमी होऊ शकते, असे एका भाजी विक्रेत्याने नमुद केले.

आयुक्तांचा वचक संपुष्टात केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात प्रथम येण्यासाठी महानगरपालिका धडपड करीत आहेत. मनपाचे तत्कालिन आयुक्त अभिजित बांगर स्वत: सकाळी फिरत होते. त्यानंतर आलेले आयुक्त तुकाराम मुंढे हे सुद्धा सीसीटीव्हीच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवत होते. परंतु, विद्यमान आयुक्त राधाकृष्णन बी. कक्षाच्या बाहेरच पडत नसल्याने झोनचे आरोग्याधिकाऱ्यांवर कुणाचाच वचक नाही. परिणामी आरोग्य निरीक्षक, जमादारच गायब असल्याने सफाई कर्मचारीही वेळेआधीच गायब होत असल्याचे दिसून येत आहे.

loading image
go to top