esakal | कुंभमेळ्यावरून येणारे १४ दिवस क्वॉरंटाईन; पोलिस प्रशासन गंभीर

बोलून बातमी शोधा

quarantine
कुंभमेळ्यावरून येणारे १४ दिवस क्वॉरंटाईन; पोलिस प्रशासन गंभीर
sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

नागपूर : हरिद्वारमधून कुंभस्नान करून परत येणाऱ्या भाविकांमुळे कोरोना पसरू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस प्रशासनाने त्यांना १४ दिवस क्वॉरंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली असून रेल्वेने परत आलेल्या भाविकांचे नाव, मोबाईल क्रमांक आणि राहण्याच्या ठिकाणाची माहिती पोलिसांनी पुरविणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी ‘सकाळ’ला सांगितले की, कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस विभाग कठोर परिश्रम घेत आहे. त्याचा भाग म्हणून रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना टेस्ट करणे सुरू केले आहे. कोरोनाचे रुग्ण वाढू नये म्हणून गुरुवारी राज्य सरकार काही दिशा-निर्देश जारी करणार आहेत. तसेच संपूर्ण व्यवस्थेवर उच्च न्यायालयाचा ‘वॉच’आहे. पोलिसांना नव्याने आदेश मिळताच त्याप्रमाणे पोलिस कारवाई करणार आहेत.

हेही वाचा: विनोद शिवकुमारच्या जामिनावर आज सुनावणी

ते म्हणाले की, विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कुंभ मेळ्यातून परत येणाऱ्या भाविकांबाबत चर्चा झाली. यामध्ये रेल्वेचे अधिकारीसुद्धा उपस्थित होते. उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणाऱ्या २२ ते २५ रेल्वेगाड्या आहेत. यामधून विदर्भातून प्रवासी येत आहेत. आता रेल्वे स्थानकावर थर्मल स्क्रिनिंग करण्यात येईल. तसेच बुकिंग केलेल्या प्रवाशांची माहिती पोलिसांना देण्यात येईल. कुंभमेळ्यावरून आलेल्या भाविकांना घरात क्वॉरंटाईन राहावे लागेल.

सीसीटीव्हीतून ‘वॉच’ ठेवू

पोलिस आणि मनपाद्वारे ५ नाका बंदीच्या ठिकाणी रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना टेस्ट करणे सुरू केले आहे. टेस्ट करण्याची क्षमता वाढविण्यात येईल. काही वाहनचालक नाकाबंदीचे ठिकाण चुकविण्यासाठी अन्य मार्गाचा वापर करतात. त्यामुळे आता रस्त्यावर फिरणाऱ्यांवर वॉच ठेवण्यासाठी सीओसीच्या सीसीटीव्हीची मदत घेण्यात येणार आहे, असेही सीपी अमितेश कुमार म्हणाले.

बुधवारची कारवाई

२८६ - नाकाबंदीत टेस्ट

१५ कोरोना पॉझिटिव्ह

१४० विना मास्क कारवाई

३६६ सोशल डिस्टन्सिंग

३३१ वाहन जप्त