‘लुटेरी दुल्हन’चे पाच जणांशी लग्न

प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर करायची लुबाडणूक
लग्न
लग्नsakal

नागपूर - पैशासाठी कोण आणि कसा घात करेल याचा काही नेम नाही. एका महिलेने तब्बल पाच जणांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि लग्न केले. काही दिवसानंतर भांडणे करून गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत पैसे लुटणे हा तर तिच्या डाव्या हातचा खेळ! बदनामीपोटी कुणीच पुढे आले नाहीत. पण तिच्याही पापाचा घडा भरला आणि अखेर कायद्याच्या कचाट्यात सापडलीच. भाविका उर्फ मेघाली दिलीप तिजारे (३५) असे आरोपी महिलेचे नाव आहे.

भाविका ही कळमन्यात २०२० पासून भाजी खरेदी करण्यासाठी जात होती. या काळात तिची महेंद्र रमेशलाल वनवानी (३२) रा. हुडको कॉलनी, जरीपटका हे कळमना बाजारात भाजीचा ठोक व्यावसायिक असून त्यातून त्यांची ओळख झाली. घटस्फोटीत असल्याची थाप मारली. दोघात सहमतीने शारीरिक संबंधही झाले. भाविका अचानक १५ सप्टेंबर २०२१ महेंद्रच्या घरी पोहोचली आणि तत्काळ लग्न केले नाहीतर लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. घाबरलेल्या वनवानी कुटुंबाने दुसऱ्याच दिवशी सिंधी पद्धतीने दोघांचे लग्न लावून दिले. १५ दिवसातच भाविकाने घरात इतकी भांडणे केली की महेंद्रला तिच्यासह वेगळे राहण्यास बाध्य केले. भांडणे कमी न होता ती वाढल्याने ती मानलेल्या भावासह जुनी मंगळवारी परिसरात राहायला गेली. त्यानंतर भाविकाने वनवानी कुटुंबाविरुद्ध हुंड्यासाठी छळ व इतर कलमान्वये गुन्हा नोंदविला.

दोन एप्रिलला पुन्हा तक्रार

मागेल तेव्हा पैसे मिळत असल्याने भाविकाला लोभ सुटला. दोन एप्रिल २०२२ ला पुन्हा तिने महेंद्रविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी पुन्हा महेंद्रला अटक केली. तिने पुन्हा ५ लाख रुपयांची खंडणी मागितली. मावस भाऊ मयूर मोटघरेसह दागिने आणि सामान घेऊन निघून गेली. दोन दिवसांपूर्वी महेंद्रची तुरुंगातून सुटका झाली. त्यानंतर वनवानी कुटुंबाने डीसीपी (गुन्हे) चिन्मय पंडित यांची भेट घेत आपबिती सांगितली. प्राथमिक तपासानंतर महेंद्रच्या तक्रारीवरून भाविकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

मानलेल्या मावसभावासोबतही लग्न

ज्या मयूर मोटघरेला मेघाली मावस भाऊ असल्याचे सांगून सोबत राहत होती, त्याच्यासोबतही तिने लग्न केले होते. महेंद्रने स्वत: दोघांना आक्षेपार्ह स्थितीत पाहिले होते. २०१८ मध्ये तिने मयूरविरुद्धही ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तिने मयूर मोटघरेशीही लग्न केल्याचे तपासात उघड झाले आहे. मयूर खरच पीडित आहे की मेघालीच्या गुन्ह्यात त्याचाही बरोबरीचा वाटा आहे, याचा तपास पोलिस करीत आहेत.

जामीनासाठीही पैसे लुबाडले

भाविकाने अनैसर्गिक अत्याचाराचा आरोप लावल्याने पोलिसांनी महेंद्रला १९ नोव्हेंबर २०२१ ला अटक केली. भाविकाने तुरुंगात जाऊन महेंद्रची भेट घेतली आणि जामिनासाठी पैसे मागितले. २७ दिवस तुरुंगात घालवल्यानंतर महेंद्रला जामीन मिळाला. दरम्यान भाविकाने त्यांच्या घरच्यांकडूनही बेल रद्द करण्याची धमकी देऊन पैसे उकळले. अशाप्रकारे तिने २ लाख १० हजार रुपये उकळले.

वर्धा जिल्‍ह्यात तिघांशी लग्न

भाविकाने २००३ मध्ये देवळी, वर्धा येथील रहिवासी कमलेश कल्याण लाकडे यांच्याशी लग्न केले. नंतर त्यांच्या विरुद्ध नंदनवन ठाण्यात हुंड्यासाठी छळ आणि मारहाणीची तक्रार दाखल केली. त्यानंतर पुलगाव येथे राहणाऱ्या नितीन मोहन गवई यांच्याशी २०१३ मध्ये लग्न केले. नंतर त्याच्याविरुद्ध सेवाग्राम ठाण्यात तक्रार दाखल केली. आनंदनगर, वर्धा येथे राहणाऱ्या सुरेश भीमराव वासनिक यांच्याशीही असेच झाले.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com