Nagpur : शस्त्रक्रिया थांबल्या ; रुग्णांचे होतायत हाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

surgery

शस्त्रक्रिया थांबल्या ; रुग्णांचे होतायत हाल

नागपूर : यवतमाळ मेडिकल कॉलेजमधील एमबीबीएसला शिकणाऱ्या अशोक पाल या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली. या घटनेचा निषेध करण्यासाठी नागपुरातील मेडिकल आणि मेयोत ४५० पेक्षा जास्त निवासी डॉक्टरांनी संपाचे हत्यार उपसले. यामुळे पहिल्याच दिवशी रुग्णांचे अतोनात हाल झाले. नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या आहेत.

शनिवारी सकाळी ८ वाजता मेडिकलमधील २७० तर मेयोतील १८० निवासी डॉक्टरांनी हातातील स्टेथेस्कोप खाली ठेवला. यामुळे बाह्यरुग्ण विभागात अवघे एक-दोन डॉक्टरच उपस्थित होते. शनिवारी मेडिकलमधील डॉक्टरांनी रुग्णालयाच्या आवारात मार्च काढून निषेध व्यक्त केला. तर मेयोत हत्या झालेल्या भावी डॉक्टरला श्रध्दांजली देण्यासाठी सायंकाळी कॅन्डल मार्च काढला. हिवाळी रजा असल्यामुळे सर्व वरिष्ठ डॉक्टर सुट्यांचा आनंद घेत होते. मात्र, निवासी डॉक्टरांनी अचानक पुकारलेल्या संपामुळे डॉक्टरांच्या रजा रद्द करीत त्वरित कर्तव्यावर हजर राहण्याचे निर्देश अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांनी दिले.

संप मिटण्याचे संकेत

यवतमाळ येथील विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केल्याची माहिती शनिवारी संध्याकाळी नागपूरातील आंदोलकांपर्यंत पोहचली. नागपुरातील मेडिकल, मेयोच्या आंदोलकांकडून बैठक घेत रात्री उशिरा आंदोलनाबाबत पुढची दिशा ठरवली जाणार असल्याचे सांगण्यात आले. आरोपीला अटक झाल्याने संप मागे घेण्याची शक्यता काहींनी नाव न टाकण्याच्या अटीवर वर्तविली.

निवासी डॉक्टरांच्या मागण्या

  1. यवतमाळात भावी डॉक्टरची हत्या करणाऱ्याला त्वरित अटक करा

  2. कुटुंबीयांना ५० लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी

  3. प्रत्येक वार्डात सुरक्षा रक्षक तैनात करावे

  4. रुग्णाजवळ एकाच नातेवाईकाला प्रवेश द्यावा

  5. रुग्णाच्या नातेवाईकाजवळ प्रवेशासाठी पासची व्यवस्था असावी

  6. रुग्णालय परिसर सीसीटीव्ही कॅमेरे व स्ट्रीट लाइट लावावेत

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांच्या सेवेसाठी निवासी डॉक्टर आहेत. परंतु त्यांनाच मारहाणच नव्हे तर हत्या केली जाते. हे भयंकर आहे. निवासी डॉक्टरांना सुरक्षित वातावरण पुरविणे गरजेचे आहे.

- डॉ. सजल बन्सल,

अध्यक्ष, मार्ड, मेडिकल

loading image
go to top