esakal | ‘मैं चोर नही हूं’ असे हातावर लिहून ट्रक चालकाने संपवले जीवन
sakal

बोलून बातमी शोधा

‘मैं चोर नही हूं’ असे हातावर लिहून ट्रक चालकाने संपवले जीवन

‘मैं चोर नही हूं’ असे हातावर लिहून ट्रक चालकाने संपवले जीवन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोंढाळी (जि. नागपूर) : ट्रकमधील ३ लाख ६८ हजार रुपये किमतीचे सोयाबीन तेलाचे १६० बॉक्स चोरी गेले. या अफरातफरी प्रकरणाच्या चौकशीसाठी चालकाला कोंढाळी पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. मात्र, महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडलगत उभ्या असलेल्या ट्रकच्या केबिनमध्ये तार गळ्याला बांधून चालकाने आत्महत्या (truck driver committed suicide) केली. ही घटना मंगळवारी (ता. १५) घडली. (The-truck-driver-committed-suicide-in-the-truck)

प्राप्त माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील महालगाव येथील सोयाबीन तेलनिर्माण कंपनीतून चालक ९ जूनच्या रात्री साडेनऊच्या सुमारास ट्रकने ४९ लाखांचे १,७०० सोयाबीन तेल बॉक्स घेऊन मुंबई भिवंडी येथे जात होता. चालक डिझेल भरण्यासाठी नागपूर-अमरावती महामार्गावरील बाजारगाव नजीकच्या सातनवरी येथील बी.पी. पेट्रोल पंपावर थांबला. रात्री साडेबाराच्या सुमारास तो पंपाच्या बाजूने वाहन उभे करून झोपला.

हेही वाचा: ‘आई, मी तुझी सेवा करायला येत आहे!’ मुलाने केली आत्महत्या

१० जून रोजी सकाळी झोपेतून उठल्यावर ट्रकच्या मागील भागातील ताडपत्री फाटलेली दिसली. सोयाबीन तेलाचे बॉक्स चोरीला गेल्याची माहिती त्याने ट्रक मालकास दिली. ट्रक मालकाने याबाबत ट्रांसपोर्टला माहिती दिली. ईस्ट अॅन्ड वेस्ट ट्रांसपोर्टचे व्यवस्थापक राजेंद्र रामभगत चव्हाण यांनी वाहनानजीक पोहोचून ट्रकमधील असलेल्या सोयाबीन तेलाच्या बॉक्सची मोजणी केली. यात १,७०० बॉक्सपैकी १६० बॉक्स कमी असल्याचे आढळले.

ट्रांसपोर्टर राजेंद्र चव्हाण यांनी चालक अशोक जितूलाल नागोत्रा (४०, रा. टेकानाका, नागपूर) याच्याविरुद्ध १४ जूनच्या रात्री बॉक्सच्या अफरातफरीबाबत तक्रार दिली. या तक्रारीवरून कोंढाळी पोलिसांनी चौकशीसाठी वाहन पोलिस ठाण्यासमोर उभे केले. ट्रकचालक वाहनात झोपला. मात्र, सकाळी ट्रकचालक अशोक नागोत्रा याने ट्रकच्या गेटला गेअर ताराने गळफास घेतला.

हेही वाचा: भाजप-काँग्रेसमध्ये वाद; बोलू दिले जात नसल्याने आमदारांमध्ये वादावादी

माझे पती आत्महत्या करूच शकत नाही!

१५ जूनच्या दुपारी घटनास्थळी पंचनामा करताना मृताची शारीरिक तपासणी केली असता डाव्या हातावर व डाव्या पायावर ‘मै चोर नही हू’ असे लिहिलेले होते. याप्रसंगी घटनास्थळी पोहोचताच मृताच्या पत्नीने हंबरडा फोडला व ‘माझे पती प्रामाणिक होते. ते आत्महत्या करूच शकत नाही’, असे रडत रडत सांगितले. तसेच कोंढाळी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूरला पाठविण्यात आले.

(The-truck-driver-committed-suicide-in-the-truck)

loading image