अबब! चक्क ३५ हजार झाडांची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tree

अबब! चक्क ३५ हजार झाडांची चोरी

यवतमाळ - शहरातील शारदा चौक ते चौपालसागर या महामार्गाच्या दुतर्फा व उड्डाणपुलाच्या चारही दिशांना भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाने लावलेली चक्क ३५ हजार २१४ झाडे चोरीला गेल्याचा संशय आहे. यासंदर्भात माजी उपनगराध्यक्ष दत्ता कुळकर्णी यांनी येथील अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे.

यवतमाळ-पांढरकवडा महामार्गाचे चौपदरीकरण, रुंदीकरण व उड्डाणपुलाच्या बांधकामात अडथळा निर्माण करणारे ८० वृक्ष तोडण्याची परवानगी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने नगरपालिकेकडे २३ मे २०१९ रोजी मागितली होती. नगरपालिकेने वृक्ष तोडल्यावर सदर रस्त्याच्या दुतर्फा प्रत्येकी दोन मीटरवर एक झाड असे एकूण ८०० वृक्ष लावावे लागतील व वृक्ष जगविण्याची जबाबदारी प्राधिकरणाची राहील, अशी अट टाकून सहा जून २०२१ रोजी परवानगी दिली. या महामार्गाचे काम पूर्ण झाल्यावर २३ जुलै २०२१ रोजी दत्ता कुळकर्णी यांनी नगरपालिकेने दिलेल्या परवानगीनुसार भारतीय राजमार्ग प्राधिकरण विभागातील माहिती अधिकाराअंतर्गत माहिती मागितली.

प्राधिकरणाने ३५ हजार २१४ वृक्ष लावल्याची माहिती दिली. तर यवतमाळ नगरपालिकेने वृक्ष लावले नाहीत (निरंक), अशी माहिती दिली. दोघांच्याही माहितीत तफावत आढळून आली. कुळकर्णी यांनी या मार्गाची स्वत: पाहणी केली. त्यावेळी त्यांना एकही वृक्ष दिसून आला नाही. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाने लावलेले ३५ हजार २१४ वृक्ष चोरीला गेल्याचा संशय व्यक्त करीत न्याय मागणीसाठी कुळकर्णी यांनी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

महामार्गाच्या रुंदीकरण, चौपदरीकरणात ८० वृक्ष तोडण्याची परवानगी देताना नगरपालिकेने ८०० वृक्षलागवडीची अट टाकली होती. दत्ता कुळकर्णी यांना माहितीच्या अधिकारात ३५,२१४ वृक्ष लागवड करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. राजमार्ग प्राधिकरण व नगरपलिकेला पत्र देऊन अहवाल मागविण्यात येईल. त्यानंतरच पुढील तपास होईल.

- मनोज केदारे, ठाणेदार, अवधूतवाडी पोलिस ठाणे, यवतमाळ.

Web Title: Theft Of 35000 Trees Report To Police Yavatmal

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top