esakal | आणखी तीन आमदारांनी दिला निधी, पण भाजपच्या एकाही आमदाराने घेतला नाही पुढाकार

बोलून बातमी शोधा

corona fund
आणखी तीन आमदारांनी दिला निधी, पण भाजपच्या एकाही आमदाराने घेतला नाही पुढाकार
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोना लढ्यासाठी आणखी तीन आमदारांनी आमदार फंड देण्याची तयारी दर्शविली असून तसे पत्र नियोजन विभागाला दिले. त्यामुळे आतापर्यंत साडेचार कोटी रुपये कोरोनाविरुध्दच्या लढाईसाठी मिळाले आहेत.

हेही वाचा: निवडणुकीच्या काळात हात जोडून मतं मागणारे लोकप्रतिनिधी कोरोनाकाळात गेले कुठे? नागरिकांचा सवाल

कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी निधी कमी पडता कामा नये, यासाठी राज्य सरकारने आमदार फंड १ कोटीने वाढवून ४ कोटी केला. यातील १ कोटींचा निधी कोरोना लढ्यासाठी आवश्यक साहित्य खरेदीसाठी खर्च करण्याच्या सूचना केल्या. जिल्ह्यात १६ आमदार आहेत. यात १२ विधानसभा व ४ विधानपरिषद सदस्य आहेत. २० दिवसांचा काळ लोटल्यावर फक्त राष्ट्रवादीचे अनिल देशमुख व शिवसेनेचे आशिष जयस्वाल या दोनच आमदारांनी १ कोटी निधी देण्याचे पत्र नियोजन विभागाला दिले. प्रसिद्धी माध्यमांसमोर येऊन रोज एकमेकांची उणीदुणी काढणारे तसेच मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना सल्ला देणारे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील एकाही आमदारांनी कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या लढ्यासाठी अद्याप निधी दिलेला नसल्याचे वृत्त प्रकाशित केले. कोरोनाच्या उपचारासाठी आव आणणारे लोकप्रतिनिधी नागरिकांच्या आरोग्याबाबत किती गंभीर आहे हे दिसून आले. या वृत्तानंतर तीन आमदारांनी निधी देण्याचे पत्र नियोजन विभागाला दिले. कॉंग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी ५० लाखांची निधी देण्याचे पत्र दिले. त्याचप्रमाणे राजू पारवे व अभिजित वंजारी यांनी १ कोटींचा निधी देण्याचे पत्र दिले. गेल्या वर्षीही मोजक्याच आमदारांनी निधी दिला होता. काहींनी तर निधीचे दिलेले पत्र परत घेतले होते. त्यांनी फक्त निधी देण्याचा आव आणला होता. आतापर्यंत भाजपच्या एकाही आमदारांनी निधी देण्याचे पत्र नियोजन विभागाला दिले नाही.