esakal | वाघाच्या अवयवाची तस्करी करणारे अटकेत
sakal

बोलून बातमी शोधा

arrested

नागपूर : वाघाच्या अवयवाची तस्करी करणारे अटकेत

sakal_logo
By
राजेश रामपूरकर :सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नागपूर-वर्धा मार्गावरील हळदगाव टोल नाक्यावर सापळा रचून वाघाच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या सात आरोपींना वन विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. वन विभागाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर सापळा रचून तस्करांना गजाआड केले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अमरावती, यवतमाळ, वर्धा या तीन जिल्ह्यांतील आरोपी असल्याने वाघांच्या शिकारी सक्रिय झाल्याची चर्चा रंगू लागली आहे.

प्रकाश महादेव कोळी (रा. कामतदेव, ता. नेर), प्रकाश रामदास राऊत (वरुड, ता. बाभूळगाव), अंकुश बाबाराव नाईकवाडे (इचोली) यवतमाळ, संदीप महादेव रंगारी (रा. वर्धा), विनोद श्यामराव मून (सावळा ता. धामणगाव), विवेक सुरेश मिसाळ (अंजनगाव), योगेश माणिक मिलमिले (सर्व अमरावती जिल्हा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. या सात आरोपींनी उमरडा वन क्षेत्रात वाघाची शिकार करून वाघाच्या अवयवांचे वाटप केले होते.

हेही वाचा: ‘महाराष्ट्र बंद’ला राज्यभरात मोठा प्रतिसाद; अनेक ठिकाणी तणाव

त्यानंतर पैशासाठी वाघांच्या अवयवांची विक्री करण्यासाठी संपर्क करण्यास सुरुवात केली. ही माहिती विभागाला मिळाली. वनविभागाने सापळा रचला आणि अवयवांची विक्री करणाऱ्यांसोबत संपर्क केला. हा व्यवहार नागपूर येथे होणार असल्याची माहिती गुप्तहेराकडून कळाली. त्यानुसार नागपूर वन विभागाच्या पथकाची चमू वर्धा-नागपूर रोडवरील हळदगाव टोल नाक्यावर दबा धरून बसली होती.

एका वाहनात अवयव असल्याचे कळताच कर्मचाऱ्यांनी छापा टाकला आणि गाडीतील सातही आरोपींना ताब्यात घेतले. आरोपीची कसून चौकशी करण्यात आली. त्यात आणखी आरोपींचा समावेश असल्याची शक्यता आहे. यापूर्वीच्या वाघाच्या अवयव तस्करीशी यांचा काही संबंध आहे का? याची तपासणी केली जात आहे. सातही आरोपींना वन्यजीव अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

तस्करी प्रकरणात मुख्य वनसंरक्षक कल्याणकुमार, उपवनसंरक्षक डॉ. भारत हांडा यांच्या मार्गदर्शनात विभागीय वनाधिकारी पी. जी. कोडापे, सहाय्यक वनसंरक्षक एन. जी. चांदेकर यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली. कारवाईत सहाय्यक वनसंरक्षक संदीप गिरी, वनपरिक्षेत्र अधिकारी बुटीबोरी एल. व्ही. ठोकळ सहभागी झाले होते.

loading image
go to top