व्याघ्र सफारी हाऊसफुल्ल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tiger Safari

व्याघ्र सफारी हाऊसफुल्ल

नागपूर - कोरोनाचे निर्बंध पुर्णपणे शिथिल होताच देशभरातील पर्यटकांचा ओढा हमखास व्याघ्र दर्शनामुळे नावारूपास आलेल्या विदर्भासह मध्यप्रदेशातील व्याघ्र प्रकल्पांकडे वाढला. त्यामुळे ताडोबा- अंधारी, पेंच व्याघ्र प्रकल्पाची सफारी मे अखेरपर्यंत हाउसफुल्ल झाली आहे. नवेगाव-नागझिरा, मेळघाट, बोर व्याघ्र प्रकल्प, उमरेड-कऱ्हाडला-पवनी, टिपेश्वर अभयारण्यातील तारखाही बुक आहेत. उन्हाळ्यातील पर्यटनाचे या क्षेत्राला पुन्हा अच्छे दिन आले आहे.

सलग दोन वर्ष घरात बसून असलेल्या नागरिक आता पर्यटनाला पसंती देत आहेत. त्यातच जून महिन्यात कोरोनाची पुन्हा चवथी लाट येईल, असा अंदाज जाणकारांनी वर्तविला आहे. त्यापूर्वी पर्यटनाला जाण्याचा बेत अनेकांनी रचला आहे. त्यामुळेच निर्बंध शिथिल होताच व्याघ्र प्रकल्पातील सफारीचे ''ऑनलाइन बुकिंग'' हाउसफुल्ल झाले आहे. जानेवारीपासून पर्यटन सुरु झाले असले तरी मार्च महिन्यापासून पर्यटकांचा जंगल सफारीकडे ओढा वाढला आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात देशभरातून पर्यटक येत आहेत. राज्यात सर्वाधिक वाघ ताडोब्यात असल्याने याला पहिली पसंती दिली जाते. त्यानंतर पेंच प्रकल्प असतो. नवेगाव-नागझिरा,मेळघाट, बोर या व्याघ्र प्रकल्पांच्या बहुतांश तारखांचे बुकिंगही फुल्ल झाल्याचे दिसून येत आहे. उमरेड-कऱ्हांडला, टिपेश्वर अभयारण्य यंदा पर्यटकांच्या यादीत आहे. गुरुवारपासून सलग चार दिवस आलेल्या सरकारी सुट्ट्यांमुळे अनेक पर्यटकांनी व्याघ्र पर्यटनस्थळांसाठी बुकिंग केले आहे. विदर्भासह मध्यप्रदेशातील कान्हा, बांधवगड, पेंच व्याघ्र प्रकल्पातही हीच स्थिती आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे आता पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. पण तेथे पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचे पर्यटकांचे म्हणणे आहे.

विदर्भातील व्याघ्र प्रकल्पासह मध्यप्रदेशातील निसर्ग पर्यटन आता पर्यटकांना खुणावू लागले आहे. याशिवाय देशांतर्गत पर्यटन स्थळे पुर्णपणे हाऊसफुल्ल झाली आहेत. कश्मीर, हिमाचल, उत्तर- पूर्व प्रदेशातील पर्यटनाला पसंती दिली जात आहे. दोन वर्षापासून थंडावलेल्या व्यवसायाला पुन्हा उभारी मिळाली आहे.

- रिटा धनवटे, संचालक, रिट्झ सफारी

व्याघ्रप्रकल्पांचे नागपूरपासूनचे अंतर (किमीमध्ये)

  • ताडोबा : १४५

  • पेंच : ९५

  • बोर : ७०

  • मेळघाट : २६०

  • नवेगाव-नागझिरा: १५०

  • टिपेश्वर : १८०

  • उमरेड कऱ्हांडला : ५५

Web Title: Tiger Safari Housefull Tourists Prefer Todoba Pench

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top