Torrential rains in Vidarbha from Tuesday; Meteorological Department warning
Torrential rains in Vidarbha from Tuesday; Meteorological Department warning

विदर्भात मंगळवारपासून मुसळधार

हवामान विभागाचा इशारा

नागपूर - उशिरा का होईना वरुणराजा आता विदर्भात सक्रीय झाला असून, शहरात सलग चौथ्या दिवशी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मध्य भारतावर कमी दाबाच्या पट्ट्यामुळे येत्या मंगळवारपासून विदर्भात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचाही इशारा दिलेला आहे.

बहुतांश जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैची सुरुवात अपेक्षेप्रमाणे चांगली झाली आहे. पावसाने लागोपाठ चौथ्या दिवशी शहरात दमदार हजेरी लावली. सकाळी अकराच्या सुमारास उत्तर नागपुरातील काही भागांत हलक्या सरी बरसल्यानंतर दुपारी एक-दीड वाजता पुन्हा दमदार पाऊस पडला. जवळपास दीड ते दोन तास सरींवर सरी सुरू होत्या. काळेकुट्ट आभाळ भरून आल्यानंतर अंधार पडला होता.

त्यामुळे दिवसाच अनेकांना हेडलाईट सुरू ठेवून वाहने चालवावी लागली. जागोजागी पाणी साचले होते. त्यामुळे वाहनधारकांची फजिती झाली. पण त्याचवेळी अनेकांनी पावसाचा आनंदही घेतला. पाऊस आणि सार्वजनिक सुटीचा दिवस (रविवार) असा दुहेरी योग आल्याने बहुतांश लोकांनी चार भिंतीच्या आड राहणे पसंत केले.

शहरात सायंकाळी साडेपाचपर्यंत २६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. २३ जूननंतर नागपुरात सर्वाधिक पावसाची नोंद रविवारी झाली. वर्धा, अमरावतीसह विदर्भातील इतरही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्याचे वृत्त आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे येत्या मंगळवारपासून दोन-तीन दिवस नागपूरसह संपूर्ण विदर्भात जोरदार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे. काही जिल्ह्यांमध्ये मुसळधारेचाही इशारा देण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com