Nagpur : चौकांमधील बंद सिग्नलमुळे अपघाताची टांगती तलवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur

Nagpur : चौकांमधील बंद सिग्नलमुळे अपघाताची टांगती तलवार

नागपूर : शहरातील अनेक चौकांमधील वाहतूक सिग्नल बंद असल्यामुळे विद्यार्थी, नागरिक, दुचाकीधारकांवर कायम अपघाताचा टांगती तलवार आहे. ऐन कार्यालयात जात असताना वाहतूक कोंडी होत असल्याने चाकरमाने त्रस्त झाले आहेत. बंद सिग्नलमुळे अनेकदा वाहतूक एकमेकांत गुंतल्याने नागरिकांची कोंडी होत आहे. मात्र महापालिकेकडून कुठलेही पावले उचलले जात नाही तर वाहतूक पोलिसही सिग्नल बंद असलेल्या चौकातून गायब दिसून येत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

शहरातील वाहतूक नियंत्रित करण्याच्या उद्देशाने चौकात वाहतूक सिग्नल लावण्यात आले. परंतु, शहरातील बऱ्याच महत्त्वाच्या चौकांतील सर्वच सिग्नल बंद आहेत. त्यामुळे वाहतूक विस्कळित झाली आहे. दिवाळीच्या सुट्यानंतर शाळा सुरू झाल्या असून गावाकडे गेलेले कर्मचारी, अधिकारीही परतले. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर पुन्हा वर्दळ वाढली. परंतु, अनेक चौक ओलांडताना नागरिकांना बंद सिग्नमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहतूक सिग्नल बंद असल्याने वाहतूक अनियंत्रित झाली आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. शहरातील रस्त्यावरील वाहनांची संख्या सातत्याने वाढत आहे. ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या वाहनांचीही भर पडल्याने चौकांतील सिग्नल सुस्थितीत ठेवण्याची गरज आहे.

चौकांमधील बंद सिग्नलमुळे अपघाताची टांगती तलवार

परंतु अंबाझरी टी पॉइंट, जाधव चौक, जगनाडे चौक, अशोक चौक, इंदोरा चौक, रहाटे कॉलनी, पंचशील चौक, सदर चौक, महाराजबाग चौक, विज्ञान संस्था चौक येथील सिग्नल अनेकदा बंदच दिसून येत आहे. वाहनांची गर्दी बघता वाहतुकीची कोंडी आणि अपघातही होण्याची शक्यता बळावली आहे. वाहतूक पोलिसांच्या चौकातील भोंग्यावरून वारंवार वाहतूक नियमांबाबत जनजागृती केली जात आहे. परंतु, सिग्नल बंद असल्याने त्याकडेही नागरिकही दुर्लक्ष करीत आहेत. अनेकदा भरधाव वाहन चालवणे, चौकातून चुकीच्या पद्धतीने गाडी चालवून वाहतुकीस अडथळा करणे, असे प्रकार सर्रास सुरू आहेत.

अनेक सिग्नलवर झाडांच्या फांद्या

शहरातील काही सिग्नलवर झाडांच्या फांद्या आल्या आहेत. त्यामुळे अनेकांना सिग्नल बंद की सुरू हेच दिसून येत नाही. सिग्नलवरील झाडांच्या फांद्या कापण्यातही महापालिकेचे सातत्य नाही. त्यामुळे अनेकदा सामान्य वाहनचालकांत संभ्रम निर्माण होत आहे.

पोलिस झाडांच्या आड

वाहतूक सिग्नल बंद असल्याने त्या चौकात वाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांची आहे. परंतु अनेकदा तीन चार वाहतूक पोलिस झाडाच्या आड उभे राहून सावज शोधण्यात गुंग असतात. त्यामुळेही अनेकदा वाहतूक विस्कळित होत आहे.