esakal | Nagpur : पदोपदी अपघाताची टांगती तलवार
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur : पदोपदी अपघाताची टांगती तलवार

Nagpur : पदोपदी अपघाताची टांगती तलवार

sakal_logo
By
राजेश प्रायकर @rajeshp_sakal

नागपूर : शहरातील अनेक चौकातील वाहतूक सिग्नल, पादचारी सिग्नल तसेच अनेक सिग्नलचे टायमरही बंद आहेत. याशिवाय अनेक रस्त्यांमध्ये विद्युत खांब उभे आहेत. अनेक रस्त्यांची कामे सुरू असून वाहनांच्या गतीबाबत फलकही नाही. खर्चात कपात करणारे महापालिका प्रशासन अन् या रस्त्यांवरून दररोज ये-जा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनीही डोळ्यावर पट्टी बांधल्याने नागपूरकरांवर पदोपदी अपघाताची टांगती तलवार कायम आहे.

गेल्या दीड वर्षांत नागपूर शहरात झालेल्या अपघातात तब्बल ३४६ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. यातील मागील सहा महिन्यांत ५६ जणांचा बळी गेला. या विदारक स्थितीतही महापालिका रस्त्यांवरील खड्डे तसेच वाहतूक सिग्नलबाबत गंभीर नसल्याचे चित्र आहे. शहरातील प्रमुख चौकातील सिग्नल बंद आहेत. त्यामुळे अनेकजण चौकातून बिनधास्त वेगाने वाहने चालवत आहेत. पोलिस तलावाजवळील टी-पॉइंटजवळील कॅम्पस चौक परिसर येथे सिग्नल बंद आहे. बेसा पॉवर हाऊसजवळ, वर्धमाननगर चौक, कॉंग्रेसनगर टी-पॉइंट, राजीवनगर टी-पॉइंट, सुभाषनगर टी-पॉइंट, सहकारनगर चौक, विद्यापीठ लायब्ररी चौक, मुंजे चौक, आनंद टॉकीज टी-पॉइंट, वाठोडा चौक, संघर्षनगर रिंग रोडवरील चौक,

पदोपदी अपघाताची टांगती तलवार

टेलिफोननगर चौक, दोसर भवन चौक, दारोडकर चौक, कडबी चौकासह अनेक चौकांतील वाहतूक सिग्नल बंद आहे. यात बहुतेक चौकात मेट्रोच्या कामामुळे वाहतूक सिग्नल बंद करण्यात आले आहेत. या ठिकाणी सावधतेचे फलक लावण्याची गरज आहे.

याशिवाय वंजारीनगर जलकुंभाजवळ सौर ऊर्जेवरील सिग्नल असून अनेकदा ते बंद असतात. लॉ कॉलेज चौक, रविनगर चौक, महाराजबाग चौक, कॉटन मार्केट चौक, टायमर अनेक दिवसांपासून बंद आहेत. म्हाळगीनगर ते जुना सुभेदार ले-आउट रस्ता, मानवता हायस्कूल ते शताब्दी चौकापर्यंतचा वर्दळीचा रस्त्यावर तसेच झिंगाबाई टाकळीतील झेंडा चौक ते राज टॉवर मार्ग, राजभवनाचे मागील गेट ते बिजलीनगर मार्ग, इतवारीतील जुने बसस्थानक परिसर विद्युत खांब उभे आहेत. या खांबामुळे रस्ता अरुंद झाला असून चारचाकी किंवा दुचाकी आदळण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच महापालिकेने रस्त्यांवरील खड्डे पावसाळ्यानंतर बुजविण्याचे सभागृहात सांगून हात झटकले, परंतु वाहतूक सिग्नल सुरू करणे, रस्त्यांवरील विद्युत खांब काढण्याकडेही काणाडोळा केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागपूरकरांवर पदोपदी अपघाताची टांगती तलवार आहे.

वाहतूक पोलिसांचे महापालिकेला पत्र

शहरातील अनेक वाहतूक सिग्नल बंद असल्याबाबत तसेच रस्त्यांवरील उभ्या खांबांबाबत वाहतूक पोलिस उपायुक्त सारंग आव्हाड यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहिले. यापूर्वीही वाहतूक पोलिसांकडून महापालिकेशी अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आला. परंतु त्याकडे महापालिकेने कायमच दुर्लक्ष केल्याचे शहरातील वाढत्या बंद सिग्नलमुळे स्पष्ट होत आहे.

गरज नाही तेथे सिग्नल

एकीकडे अनेक चौकांत वाहतूक सिग्नल नाहीत किंवा बंद आहेत. परंतु जेथे गरज नाही, त्याठिकाणी महापालिकेने वाहतूक सिग्नल लावल्याचे वाहतूक पोलिसांनी महापालिकेला दिलेल्या पत्रात नमुद केले आहे. मुंजे चौक, धरमपेठ कॉफी हाऊस चौक, मोहम्‍मद रफी चौक, मंगलदीप चौक, जुना नंदनवन चौकात गरज नसतानाही वाहतूक सिग्नल सुरू आहेत.

loading image
go to top