Train Chain : चेन पुलिंग केल्‍यास खैर नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Railway department action against  Train Chain pulling

Train Chain : चेन पुलिंग केल्‍यास खैर नाही

नागपूर : अनावश्यक चेन पुलिंग करून रेल्वे थांबविण्याच्या प्रकारात गेल्या काही दिवसात सतत वाढ होत आहे. दुरांतो एक्स्प्रेसमध्ये सर्वाधिक चेन ओढल्या जात असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. त्यामुळे रेल्वे सुरक्षा बलाने आता चेन पुलिंग करणाऱ्यांवर करडी नजर ठेवली आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात ७० अशी प्रकरणे घडली. तर दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात २१ प्रकरणे उघडकीस आली आहे.

रेल्वे प्रशासनाने नुकतेच साखळी ओढण्याच्या नियमात बदल केले तरी हे प्रकार थांबण्याचे नाव नाहीत. त्यामुळे इतर प्रवाशांसोबत रेल्वे प्रशासनाचा मनस्ताप वाढला आहे. चेन पुलिंगने अचानक गाडीची गती कमी होऊन रेल्वे रुळावरून घसरण्याची भीती असते. त्यासोबतच गाड्यांना विलंब होतो.

नागपूरच्या मध्यवर्ती रेल्वे स्थानकावरून दुरांतो गाडी पकडण्यासाठी सर्वात जास्त चेन पुलिंग होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. प्रवासी स्थानकावर उशिराने पोहोचतात त्यामुळे गाडी पकडण्याच्या नादात त्यांचे सहकारी चेन ओढत असल्याचेही पुढे आले आहे.

गावात मध्येच उतरण्यासाठी आणि गंमत म्हणूनही काही प्रवासी चेन ओढतात. त्यामुळे इतर प्रवाशांची मोठी गैरसोय होते. रेल्वे गाडीत आग लागल्यास, जर एखादी वृद्ध किंवा अपंग व्यक्ती गाडीत चढू शकत नसेल, प्रवाशाची अचानक प्रकृती खालाविल्यास किंवा गाडीत दरोडा पडल्यास या कारणासाठी चेन पुलिंग आवश्यक मानले जाते.

दोन विभागात ९० घटना

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात महिन्याभरात ७० घटना अनावश्यक चेन पुलींगच्या घडल्या आहेत. तर दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात २१ घटना घडल्या. दोन्ही विभाग मिळून ९० च्यावर घटना घडल्यात. रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना राबवीत असले तरी अशा प्रकाराने त्यांची कोंडी होत आहे.

आता होणार ही कारवाई

  • अनावश्यक चेन पुलिंगच्या नियमात बदल

  • रेल्वे ॲक्ट १४१ नुसार ५०० ते १००० रुपयापर्यंत दंड

  • चेन पुलिंगचा प्रकार पाहून मोठी कारवाईचीही शक्यता

  • अटक होऊन ३ महिने ते वर्षभराचा कारावास होऊ शकतो

  • तरुण वर्गाला यामुळे सरकारी नोकरी सुद्धा गमवावी लागू शकते

अनावश्यक चेन पुलिंगचे प्रकार सुरूच आहे. दुरांतो एक्स्प्रेसमध्ये गाडी पकडण्याच्या नादात प्रकार वाढले आहे. यामुळे गाड्यांना विलंब होतो. प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर लवकर पोहोचावे. अनावश्यक चेन पुलिंग करणाऱ्यांवर रेल्वे ॲक्ट १४१ नुसार आता कठोर कारवाई करण्यात येत आहे. यासाठी आमची मोहीम सुरू आहे.

- आशुतोष पांडे, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त (मध्य रेल्वे)

Web Title: Train Chain Pulling Stop Action Railway Department

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..