प्रशिक्षणार्थी परिचारिकांना मिळतात फक्त १२ रुपये | Nagpur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉक्टर

नागपूर : प्रशिक्षणार्थी परिचारिकांना मिळतात फक्त १२ रुपये

नागपूर : ‘राहू द्या नं भाऊ... आमची गत काय विचारता... मोलकरणींपेक्षाही वाईट आमचं आयुष्य...आम्ही प्रशिक्षणार्थी परिचारिका आहोत. जनरल नर्सिंग अभ्यासक्रम पूर्ण करीत आहोत. आठ तास वॉर्डात सेवा देतो. रुग्णांची शुश्रूषा करतो. आजारी पडल्यावर आम्हाला उपचार खर्चही मिळत नाही. आम्हाला मिळणारे विद्यावेतन महिन्याला ३५६ रुपये. दर दिवसाचा हिशेब मांडला अवघे साडेअकरा-१२ रुपये’ अशा शब्दात जीएनएन स्कूलमधून तयार होणाऱ्या प्रशिक्षणार्थी परिचारिकांनी भावना व्यक्त केल्या.

राज्यात २१ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये आहेत. यापैकी १२ महाविद्यालयांत जनरल नर्सिंग अभ्यासक्रम सुरू आहे. नागपूरच्या मेडिकलमध्ये जीएनएम बंद करीत बीएससी नर्सिंग अभ्यासक्रम सुरू केला. सद्या या अभ्यासक्रमात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १ हजारांपेक्षा अधिक मुली दरवर्षी प्रवेश घेतात. तीन वर्षांत ३००० परिचारिका जीएनएम अभ्यासक्रमातून सरकारी रुग्णालयातून तयार होतात. या अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या मुली या गरीब घरातील असतात. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर कुठेतरी नोकरी मिळेल, हा विश्‍वास असतो.२०१५ मध्ये भाजप काळात विद्यावेतन वाढीचा मुद्दा अजेंड्यावर आला होता. पण फडणवीस सरकारने या प्रस्तावाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या असल्याची माहिती पुढे आली आहे.

हेही वाचा: रत्नागिरी : जातीच्या दाखल्यांचा भार पेलता पेलेना

निवासी डॉक्टरांना ६० हजार...

१९६७ साली निवासी डॉक्टरांना विद्यावेतन ५ हजांरापेक्षा कमी होते. पण गेल्या ५४ वर्षात वेतनाचा हा आकडा ६० हजारांपेक्षाही जास्त झाला. एमबीबीएस पूर्ण करणाऱ्या आंतरवासितांचे विद्यावेतन १० हजारांच्या पुढे आहे. मात्र, १९६७ साली जीएनएम अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थी परिचारिकांना महिन्याचे अवघे ३५६ रुपये विद्यावेतन मिळत होते. तेवढेच ३५६ रुपये विद्यावेतन ५४ वर्षांनंतरही मिळत असल्याचे विदारक वास्तव पुढे आले आहे. पहिल्या वर्षाला मिळणाऱ्या विद्यावेतनात दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी झालेली वाढ पाहिल्यास आश्चर्य वाटते. कारण त्यात अवघी १० रुपयाने वाढ झाली आहे.

विद्यावेतनातील वाढ

पहिल्या वर्षी- ३५६ , दुसरे वर्षे - ३६६ , तिसरे वर्षे - ३७६

शिकाऊ डॉक्टरांना १० हजार, निवासी डॉक्टरांना ६० हजार विद्यावेतन देण्यात येते. मात्र ३ वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करताना जनरल नर्सिंग अभ्यासक्रमातील प्रशिक्षणार्थी परिचारिकांच्या सेवेचे मोल मागील ५४ वर्षात सरकारला कळले नाही. १९६७ एक रुपयाची विद्यावेतनात वाढ झाली नाही. या प्रशिक्षणार्थी परिचारिकांना महिन्याला किमान ५ हजार रुपये विद्यावेतन द्यावे, असा निर्णय शासनाने घ्यावा.

-नरेंद्र कोलते, माजी अध्यक्ष, ग्रॅज्युएट नर्सेस टीचर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र,

loading image
go to top