Nagpur : सणासुदीत रेल्वे गाड्या रद्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Railway

Nagpur : सणासुदीत रेल्वे गाड्या रद्द

नागपूर : रेल्वेच्या विविध ठिकाणी सुरू असलेल्या कामांमुळे रेल्वेगाड्या मोठ्या प्रमाणात रेल्वेगाड्या रद्द करण्यात येत आहे. ऐन सणासुदीच्या काळात गाड्या रद्द होत असल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. लांब अंतरासाठी पर्यायी साधनांचा विचार करावा लागत आहे.

मध्य रेल्वेच्या बिलासपूर विभागातील रायगड- झारसुगुडा येथे नॉन इंटरलॉकिंगच्या कामामुळे तब्बल ४२ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या सर्व गाड्या नागपूर विभागातून जाणाऱ्या आहेत. त्याचप्रमाणे सोलापूर मंडळातील दौंड-मनमाड दुसऱ्या मार्गाचे नॉन इंटरलॉकिंगचे काम सुरू आहे. या कामामुळे मध्य रेल्वेच्या नागपूर-पुणे मार्गावरील बहुतांश गाड्या २३ ते ३० सप्टेंबर आणि काही गाड्या १ ते ११ ऑक्टोबरपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

वेटिंग वाढले, पर्यायी साधनांचा विचार

येत्या काही दिवसात दसरा आणि त्यानंतर दिवाळीचा सण आहे. या काळात सुट्या असल्याने पर्यटनासह सण साजरा करण्यासाठी मुळ गावी जाणाऱ्या लोकांची प्रवासात गर्दी असते. अचानक गाड्या रद्द होत असल्याने प्रवाशांचा हिरमोड होत आहे. पुणे, मुंबई, हावडा तसेच उत्तर भारतात जाणारे प्रवासी नागपूर विभागातील जास्त आहे. नेमक्या याच मार्गावरील गाड्या रद्द होत असल्याने प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे प्रवासी पर्यायी गाड्यांचा विचार करू लागले आहेत. मात्र, इतर गाड्यांमध्ये वेटिंग मोठ्या प्रमाणात आहे. लांब पल्ल्यासाठी सुद्धा खासगी ट्रॅव्हल्स सारख्या पर्यायी साधनांचा विचार करावा लागत आहे.

हावडा, पुणे मार्गावरील प्रवाशांना मनस्ताप

हावडा आणि पुणे मार्गावरील प्रवाशांना सर्वात जास्त मनस्ताप आहे. रद्द होणाऱ्या गाड्यांमध्ये या मार्गांचा समावेश आहे. यासोबतच मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. हावडा-पुणे, हावडा- सीएसटीएम, शालीमार-एलटीटी, काजीपेठ-पुणे, अजनी-पुणे एक्स्प्रेस आदी रद्द गाड्यांचा समावेश आहे.

गाड्यांना विलंब

नॉन इंटरलॉकिंगचे काम सुरू असल्याने गाड्यांना विलंब होत आहे. या गाड्यांमुळे प्रवाशांचे पुढचे वेळापत्रक विस्कळित होत आहे. गेल्या काही दिवसांपासून बहुतांश गाड्या २ ते १० तास उशिराने धावत आहे. त्यामुळे कुटुंबासह प्रवास करीत असलेल्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.