esakal | पोलिसांचीच इभ्रत पणाला; जामिनावर सुटताच चोराने नाकावर टिच्चून ठाण्यासमोरून चोरून नेला ट्रक
sakal

बोलून बातमी शोधा

Truck stolen from police station

गेल्या आठवड्यात गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करून ट्रक चोरास पकडले. २० टन लोखंडी सळाखीसह ट्रक आणि चोर लकडगंज पोलिसांच्या सुपूर्द केला. मात्र, जामिनावर सुटल्यानंतर त्याच चोराने लकडगंज पोलिस ठाण्यासमोर ठेवलेला ट्रक पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुन्हा चोरून नेला.

पोलिसांचीच इभ्रत पणाला; जामिनावर सुटताच चोराने नाकावर टिच्चून ठाण्यासमोरून चोरून नेला ट्रक

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : क्रिकेट सट्टेबाजापासून ते गंगाजमुनातील वारांगणांकडून पैसे वसुली करण्याचा प्रताप करणाऱ्या लकडगंज पोलिसांचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्याने चक्क लकडगंज पोलिस ठाण्यात उभा असलेला जप्तीचा ट्रक चोरून नेला. सामान्यांची सुरक्षा करण्याचा दावा करणाऱ्या पोलिसांना स्वतःच्या ताब्यात असलेल्या मुद्देमालाचे रक्षण करता येत नाही, अशी चर्चा रंगू लागली आहे. यामुळे पोलिसांची इभ्रत पणाला लागली आहे.

गेल्या आठवड्यात गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करून ट्रक चोरास पकडले. २० टन लोखंडी सळाखीसह ट्रक आणि चोर लकडगंज पोलिसांच्या सुपूर्द केला. मात्र, जामिनावर सुटल्यानंतर त्याच चोराने लकडगंज पोलिस ठाण्यासमोर ठेवलेला ट्रक पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुन्हा चोरून नेला. पोलिसांना आव्हान देणारी घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास लकडगंज पोलिस ठाण्यासमोर घडली. या घटनेमुळे लकडगंज पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न निर्माण झाला.

सविस्तर वाचा - चाळीसचे फेडले ८५ लाख; तरी सावकार करायचा १३ लाखांची मागणी; त्रास असह्य झाल्याने घेतला गळफास

संजय ढोणे (५२ रा. झिंगाबाई टाकळी) असे ट्रक चोराचे नाव आहे. चोरीचा ट्रक आणि लोखंडी सळाख जप्त करून मुद्देमालासह लकडगंज पोलिसांच्या ताब्यात दिला होता. पोलिस कारवाईनंतर ट्रकचोराला न्यायालयात हजर करण्यात आले. कायदेशीर कारवाई पूर्ण नसल्याने लोखंडी सळाखीसह ट्रक लकडगंज ठाण्यासमोरच होता. पोलिसांच्या नजरेसमोर असतानाही ट्रक सोमवारी पहाटेच्या सुमारास चोरून नेला.

अशी झाली चोरी

नेताजीनगर निवासी फिर्यादी संतोष पांडे (३८) हे दहाचाकी ट्रकने २० टन सळाख भरून निघाले. सकाळी ७.३० वाजता सदर ट्रक लकडगंज हद्दीतील पुष्कर समाज भवन समोर उभा करून ते अंघोळीला गेले. हीच संधी साधून चोरट्याने लोखंडी सळाखीसह ट्रक घेऊन पळाला. ही घटना १० ऑक्टोबरला घडली. याप्रकरणी लकडगंज पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

अधिक वाचा - सोन्याला झळाळी; साठ हजारांचा आकडा करेल पार, ग्राहकांची पावले वळू लागली दुकानांकडे

गांभीर्य गरजेचे

पोलिस आयुक्त अमितेश कुमार कडक शिस्तीचे अधिकारी आहेत. मात्र, त्यांच्या आदेशाला ठाणेदार गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेला ट्रक चोरून नेण्याची हिंमत चोरटे करीत असतील तर लकडगंज पोलिसांचा किती वचक गुन्हेगारांवर आहे, याची प्रचिती येते. त्यामुळे आता खुद्द पोलिस आयुक्तांनाच गांभीर्य दाखवणे गरजेचे आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

loading image