
नागपूर : उपराजधानीत गुरुवारी दिवसभरात कोरोना बाधित आढळला नाही. मात्र, रात्री मेडिकलच्या प्रयोगशाळेत सतरंजीपुरा येथील 28 वर्षीय युवकासहित सारीच्या 20 वर्षीय युवकासह 65 वर्षांच्या वृद्धाला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल पुढे आला होता. शुक्रवारी यात आणखी 12 रुग्णांची भर पडली. नागपुरातील टिमकी भानखेडा परिसरातील 12 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे एकट्या नागपुरातील बाधितांचा आकडा 330 वर पोहोचला आहे.
शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत चालले आहेत. विशेषतः मोमिनपुरा, सतरंजीपुरा हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले. मोमिनपुऱ्यात सुमारे 155 तर सतरंजीपुरा येथे 103 कोरोनाबाधित आढळले आहेत. याशिवाय शांतीनगर, खामला, जरीपटका, पार्वतीनगर, बजाजनगर, यशोधरानगर, राजीवगांधीनगर, टिमकी, कुंदनलालगुप्तनगर, बैरागी पुरा, जयभीमनगर, गणेशपेठ, मोठा ताजाबाद, गिट्टीखदान, कुशीनगर, गौतमनगर या हद्दीतील संक्रमित भाग पूर्णपणे सील करण्यात आला.
काही दिवसांपूर्वी सुमारे तीन हजारांपेक्षा अधिक लोकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. मात्र, चाचणीचा वेग वाढल्यामुळे विलगीकरणात आता 2 हजार 114 आहेत. प्रभावी उपचारांद्वारे रुग्ण संख्या कमी करण्यासाठी मेडिकल आणि मेयोतील डॉक्टरांकडून प्रयत्न केले जात आहेत.
मेयो, मेडिकलसह एम्स, नीरी आणि पशुवैद्यक प्रयोगशाळेत सुमारे 6 हजार 832 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. गुरुवारी एकाच दिवशी 547 चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर मागील तीन दिवसांत दीड हजारांपेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यात बुधवारी रात्रीपासून गुरुवारी सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुमारे पाचशेवर जणांचे नमुने नकारात्मक आले आहेत. त्यामुळे पाचपावली आणि व्हीएनआयटी विलगीकरण केंद्रातून तब्बल 383 जणांना सुटी दिली गेली. दुसरा कोरोना अहवाल नकारात्मक आल्यामुळे इतरही काही केंद्रातून मोठ्या संख्येने नागरिक घरी परतले. येथे सुरुवातीला एकदा आणि चौदा दिवसांनी दुसऱ्यांदा अशी दोनदा प्रत्येकाची कोरोना चाचणी करण्यात आली. गुरुवारी एकाच दिवसात चारशेहून अधिक व्यक्तींचे नमुने नकारात्मक आल्याने दोन केंद्रातून 383 तर इतरही केंद्रातून बऱ्याच जणांना घरी पाठवले गेले.
उपराजधानीत मेडिकल आणि मेयोतील योग्य आणि प्रभावी उपचारातून कोरोनाबाधितांचे बरे होण्याचे प्रमाण 35 टक्के आहे. तर मृत्युदरावर नियंत्रण ठेवण्यात इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांना यश आले आहे.
भारतीय वैद्यकीय अनुसंधान परिषदेने (आयसीएमआर) कोरोनाबाधितांमध्ये लक्षणे नसल्यास त्याला सलग दहा दिवस रुग्णालयांत निरीक्षणात ठेवण्यात यावे. यापुढेही एकही लक्षण किंवा आरोग्याची इतर समस्या न उद्भवल्यास कोरोना चाचणी सक्तीची न करता अशा रुग्णाला सुटी देण्यात यावी. या आशयाची नवीन सूचना काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार मेडिकलमध्ये प्रथमच सुमारे 22 जणांना सुटी दिली गेली. याशिवाय 6 जणांना कोरोनामुक्त करण्यात आले, अशा एकूण 28जणांना मेडिकलमधून सुटी देण्यात आली. याशिवाय मेयो रुग्णालयातून काही रुग्णांना सुटी देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.