esakal | 'आईला कोरोना झालाय, उपचारासाठी पैसे हवेत; हा सोन्याचा हार घ्या'

बोलून बातमी शोधा

file photo
'आईला कोरोना झालाय, उपचारासाठी पैसे हवेत; हा सोन्याचा हार घ्या'
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : 'आईला कोरोना (corona) झाला असून ती रुग्णालयात भरती आहे. तिच्या उपचारासाठी सहा लाख रूपयांची गरज आहे. आमच्याकडे आठ लाखांचे सोने आहे, ते घ्या आणी फक्त सहा लाख द्या, अशी विनवणी दोघांनी एका मिरची व्यापाऱ्याला केली. व्यापाऱ्यानेही दोन लाखांचा फायदा पाहता लगेच साडेचार लाख रूपये दिले आणि सोने ठेवून घेतले. मात्र, ते सोने नकली निघाले. अशाप्रकारे व्यापारी आमिषाला बळी पडल्याने गंडा (fraud) घातल्या गेला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी (MIDC police) अज्ञात दोन भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (two boy fraud four lakh 50 thousand rupees with man in nagpur crime news)

हेही वाचा: सायबर गुन्हेगाराच्या घशातून पैसे आणले परत; नागपूर सायबर पोलिसांची कामगिरी

रमाबाई आंबेडकरनगर, जयताळा येथे राहणारे सुभाष नत्थुजी वाघमारे (६०) हे जयताळा शेवटचा बसथांबा येथे मिरचीचे दुकान लावतात. ३० एप्रिल रोजी सकाळी १० च्या सुमारास वाघमारे हे आपल्या दुकानात हजर असताना दोन तरुण त्यांच्या दुकानाजवळ रडताना दिसले. वाघमारे यांनी रडण्याचे कारण विचारले असता त्यांनी सांगितले की, ‘आमच्या आईला कोरोना झाला असून ती वोक्हार्ट हॉस्पिटल येथे भरती आहे. तिच्या उपचारासाठी पैसे नाहीत. आमच्याजवळ दागिने आहेत. परंतु, दागिन्यांच्या मोबदल्यात कुणीही पैसे द्यायला तयार नाही. सराफाचे दुकान बंद असल्याने दागिने विकू शकत नाही. काही दिवसांसाठी सोन्याचे दागिने तुमच्याजवळ ठेवा आणि आम्हाला पैसे द्या. मदत केल्यास आम्ही तुम्हाला ५० हजार रुपये देऊ’ असे म्हटले. त्याचप्रमाणे दोन्ही आरोपींनी सोन्याचे मनी असलेला हार वाघमारे यांना दाखविला. त्यातील चार मनी तोडून तपासणीसाठी वाघमारे यांना दिले. वाघमारे यांनी त्या मन्यांची तपासणी केली असता ते खरे असल्याचे समजले. २ मे रोजी दुपारी १२ च्या सुमारास दोन्ही आरोपी वाघमारे यांच्या घरी आले. त्यांना हार दिला. हा हार ठेवून घ्या आणि आम्हाला सहा लाख रुपये द्या असे म्हटले. त्यावर वाघमारे यांनी साडेचार लाख रुपये देऊ शकतो असे त्यांना म्हटले. वाघमारे यांनी साडेचार लाख रुपये देऊन हार घेतला. सायंकाळी त्या हाराची तपासणी केली असता तो हार पितळीचा निघाला. आपली फसगत झाल्याचे समजताच वाघमारे यांनी एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून तक्रार केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.