esakal | सायबर गुन्हेगाराच्या घशातून पैसे आणले परत; नागपूर सायबर पोलिसांची कामगिरी

बोलून बातमी शोधा

सायबर गुन्हेगाराच्या घशातून पैसे आणले परत; नागपूर सायबर पोलिसांची कामगिरी
सायबर गुन्हेगाराच्या घशातून पैसे आणले परत; नागपूर सायबर पोलिसांची कामगिरी
sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : गेल्या वर्षभरापासून कोरोना आणि लॉकडाउनमुळे (Corona Lockdown) अनेकांची आर्थिक स्थिती ढासाळली आहे. अनेक जण बेरोजगार झाले असून काहींनी पदरच्या पैशातून संसाराचा गाडा हाकणे सुरू केले आहे. अशातच सायबर गुन्हेगारांनी (Cyber Criminals) तोंड वर काढले आहे. सायबर गुन्हेगारांनी दोघांचे जवळपास दोन लाख ५२ हजार रूपये परस्पर लंपास केले होते. परंतु, सायबर पोलिसांनी (Nagpur Cyber Police) त्वरित कारवाईचा फास घट्ट करीत गुन्हेगाराच्या घशातून पैसे परत आणले आणि फसवणूक झालेल्या व्यक्तीच्या स्वाधीन केले. (Nagpur Cyber police brings back money of person from criminals)

हेही वाचा: कौतुकास्पद! कोरोनाग्रस्तांसाठी तरुण बनला देवदूत; स्वतःच्या गाडीला रुग्णवाहिका बनवून दिवसरात्र सेवा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीताराम चतुर्वेदी (५६ , रा . गोरेवाडा) यांना एका आरोपीने कॉल करून तुमच्या बँक खात्यातून २ लाख १० हजार रूपये काढल्याचे सांगितले. चतुर्वेदी यांनी बँक खात्याची माहिती कोणालाही दिली नव्हती. ते रामदासपेठ येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गेले. तिथे त्यांना कोणीतरी बँक खात्यातून २ लाख १० हजार रुपयांची ऑनलाइन एफडी केल्याची माहिती मिळाली. त्यांनी ३१ मार्च २०२१ रोजी सायबर पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दिली.

सायबर ठाण्याचे एपीआय केशव वाघ आणि श्रीकृष्णा ईवनाते यांनी लगेच स्टेट बँक ऑफ इंडियाशी फोन व ई-मेलद्वारे संपर्क केला. तसेच तक्रारीचा सतत पाठपुरावा करून ट्रान्सफर केलेली २ लाख १० हजारांची रक्कम पुन्हा बँक खात्यात परत आणण्यात यश आले.

दुसऱ्या घटनेत निकेश वासुदेव उके (४८, त्रिमूर्तीनगर) यांना त्यांच्या मोबाइलवर एक लिंक आली. अनावधानाने ती लिंक ओपन करण्यात आली. त्यांच्या बँक खात्यातून ५० हजार ९९७ रुपये परस्पर ऑनलाईन पद्धतीने फ्लिपकार्टच्या माध्यमातून काढून घेतले. निकेश उके सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

हेही वाचा: तुम्हाला WhatsApp कोणी ब्लॉक केल्यानंतरही करा त्यांच्याशी चॅट; कसं ते जाणून घ्या

उके यांच्या तक्रारीवरून फ्लिपकार्टच्या या ऑनलाइन साइटला फोन व ई - मेलद्वारे वारंवार पत्रव्यवहार करून तसेच तक्रारीचा सतत पाठपुरावा करून फसवणूक झालेली ५० हजार ९९ ७ रुपये सायबर पोलिसांनी परत मिळवले. ही कारवाई पीआय बागूल, सहाय्यक पोलिस निरीक्षक केशव वाघ व श्रीकृष्णा इवनाते यांनी केली.