esakal | रेमडेसिव्हिरचा काळाबाजार थांबता थांबेना, आणखी दोन वॉर्ड बॉयला अटक
sakal

बोलून बातमी शोधा

Remdesivir

रेमडेसिव्हिरचा काळाबाजार थांबता थांबेना, आणखी दोन वॉर्ड बॉयला अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार पुन्हा फोफावला असून प्रशासनाच्या नाकावर टिच्चून इंजेक्शनची चढ्या दरात विक्री करण्यात येत आहे. काळाबाजार करणाऱ्या टोळीचा सुळसुळाट निर्माण झाला असून यात वैद्यकीय क्षेत्रातील एमआरपासून ते डॉक्टरांपर्यंत समावेश आहे. अशाच एका टोळीचा प्रतापनगर पोलिसांनी पर्दाफाश केला. सदरमधील किग्सवे हॉस्पिटलमधील दोन वॉर्ड बॉयसह तिघांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. निखिल बळवंत डहाके (वय २६ रा. समुद्रपूर, जि.वर्धा), दीपक श्रीराम महोबिया (वय २७ ) व संजय शिवपाल यादव (वय २८ दोन्ही मूळ रा. पाधार,जि.बैतुल ,सध्या रा.उप्पलवाडी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा: व्हीआयपींच्या एका फोनवर मिळतो लसीचा डोस; सामान्यांना मात्र बाहेरचा रस्ता; नागपुरातील वास्तव

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक व संजय हे किग्स वे हॉस्पिटलमध्ये काही महिन्यांपासून वॉर्ड बॉय म्हणून कार्यरत आहेत. निखिल हा बीएसस्सी आहे. त्याची बहीण व जावई वर्धा मार्गावरील एका हॉस्पिटलमध्ये काम करतात. दीपक हा निखिल याच्या जावायाचा मित्र आहे. त्यामुळे निखिल याची दीपकसोबत ओळख झाली. नागपुरात रेमडेसिव्हिरची प्रचंड मागणी असल्याने ती काळाबाजार करून विकण्याचा कट निखिलने आखला. यासाठी दीपक याची मदत घेतली. एक रेमडेसिव्हिर ३० हजारांमध्ये विकून दहा हजार रुपये निखिल हा स्वत:कडे ठेवायचा. निखिल हा रेमडेसिव्हिरचा काळाबाजार करीत असल्याची माहिती आयपीएस नुरूल हसन यांना मिळाली. डीसीपी हसन यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वात प्रतापनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर ठोसरे, सहाय्यक उपनिरीक्षक अनिल ब्राह्मणकर, हवालदार दिनेश बावनकर, शिपाई किरण, मोना चक्रवर्ती व रोशनी यांनी आयटी पार्कजवळील बिग बाजार समोर रविवारी सायंकाळी सापळा रचला. निखिल याच्यासोबत संपर्क साधला. ३० हजार रुपयांमध्ये निखिल याने रेमडेसिव्हिर देण्याचे मान्य केले. त्याने पोलिसाकडून दहा हजार रुपये घेतले. त्यांनतर दोन तासांनी निखिल हा रमेडेसिव्हिर घेऊन आला. पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून इंजेक्शन, दोन मोटारसायकली व ५४ हजार रुपयांची रोख जप्त करण्यात आली. निखिल बिनधास्तपणे रेमडेसिव्हिरची विक्री काळ्याबाजारात करीत होता.

व्हॉटस्अ‌ॅपवरून मेसेज -

निखिल हा व्हॉटस्अ‌ॅपवर स्टेटसमध्ये 'रेमडेसिव्हिर अव्हेलेबल' असा मेसेज ठेवत होता. त्याचे स्टेटस बघून त्याच्याशी अनेक जण संपर्क साधत होते. तो प्रत्येकाला ३० हजार रुपये द्या आणि इंजेक्शन घ्या, अशी खुली ऑफर देत होता. निखिल याने आतापर्यंत किती इंजेक्शन विकले, याचा तपास पोलिस करीत आहेत.

loading image