esakal | डेंगीचा डंख उठला जीवावर, एकाच गावातील दोन तरुणींचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Dengue

डेंगीचा डंख उठला जीवावर, एकाच गावातील दोन तरुणींचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मोहपा (जि. नागपूर) : मोहपा येथे डेंगी आजारामुळे (dengue cases nagpur) दोन तरुणीचा मृत्यू झाल्यामुळे गावातील नागरिकांत संतापाचे वातावरण निर्माण झालेले आहे. गावामध्ये मे महिन्यापासून डेंगीचा प्रसार सुरू झाला. पण पाच महिन्यानंतरही डेंगी आजारावर मात करण्यास स्थानिक प्रशासन व आरोग्य विभाग सपशेल अपयशी ठरलेले आहे. येथील कीर्ती धर्मेंद्र पारेख (वय२१) व जयश्री राधेशाम सव्वाशेरे (वय२१) या दोन्ही तरुणीचा डेंगी आजारामुळे मृत्यू झाला. कीर्ती पारेख ही एमएससी (रसायनशास्त्र) द्वितीय वर्षाला शिकत होती, तर जयश्री ही पॅरामेडिकल सायन्स येथून डीएमएलटीला शिक्षण घेत होती. या दोन्ही तरुणीच्या मृत्यूंमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: आता डेंगी तपासणी किटचाही तुडवडा, ७०० नमुने तपासणीच्या प्रतीक्षेत

या व्यतिरिक्त गावात डेंगीचे अनेक रुग्ण आहेत. काही बरे झाले, तर काही औषधोपचार घेत आहेत. अजून किती बळी जातील, अशा शब्दात नागरिक आपला रोष व्यक्त करत आहेत. स्थानिक प्रशासनाकडून योग्य प्रकारे उपाययोजनांची अंमलबजावणी झाली नसल्यामुळे डेंगीचा प्रसार होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये दिसत आहे. फक्त्त एकदा फॉगिंग झाली असल्याचे लोकांकडून बोलल्या जात आहे. डेंगीचा प्रसार थांबावण्यस प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे.

कुटुंब हळहळले

जयश्री हिच्या घरी भेटीदरम्यान मुलीचे वडील अक्षरशः ढसाढसा रडायला लागले. ‘इतक्या लाडाने, कष्टाने माझ्या मुलीला वाढवलं व अशा प्रकारे माझ्या मुलीचा मृत्यू झाला. याला जवाबदार कोण?’ असा प्रश्न विचारत सर्व कुटुंबानी हंबरडा फोडला. अशाच प्रकारची व्यथा कीर्तीच्या घरी पण बघावयास मिळाली. बरोबरीच्या मुलींचा ऐन उमेदीच्या काळात मृत्यू होणे ही अत्यंत दुःखद बाब आहे. गावातील सगळी जनता हळहळ करीत आहे. त्या दोन्ही कुटुंबाला किती दुःख झाले असेल, याचा विचारही करू शकत नाही.

माझी मुलगी डेंगी या आजाराने देवाघरी गेली, पण अशी घटना इतर लोकांसोबत घडू नये. यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्या.
-राधेश्याम सव्वाशेरे, मृत मुलीचे पालक
गावामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचत असल्यामुळे मच्छरांची पैदास होत आहे. लोकांना या आजाराशी लढा द्यावा लागत आहे. परंतु प्रशासन गाढ झोपेत आहे. अजून किती बळी घेतल्यावर प्रशासनाला जाग येईल?
-भीमराव डोंगरे, सरसिटणीस विदर्भ प्रदेश, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( आंबेडकर)
गावामध्ये नियमित फॉगिंग होत नाही. नाल्यांची साफसफाई होत नाही की जनजागृती होत नाही. प्रशासन गाढ झोपेत असून गावातील नागरिकांच्या जीवसोबत खेळत आहे. दोन तरुण मुलींचा नाहक जीव गेला यास जबाबदार कोण?
-राजू सोहनलाल बेरी, अध्यक्ष व्यापारी संघ, मोहपा
loading image
go to top