esakal | आईने टाकलेल्या बाळासाठी मंगेशी झाली माई; उमेद संकल्प संस्थेने घेतले दत्तक
sakal

बोलून बातमी शोधा

Umed sankalp Sanstha  adopted orphan child

ही कहाणी आहे पुलगाव (जि. वर्धा) येथील एका १९ वर्षीय महाविद्यालयीन मुलीची. पीडित मुलीची साधारण एक वर्षापूर्वी सोशल मीडियावरून मुंबईच्या एका मुलाशी मैत्री झाली.

आईने टाकलेल्या बाळासाठी मंगेशी झाली माई; उमेद संकल्प संस्थेने घेतले दत्तक

sakal_logo
By
नरेंद्र चोरे

नागपूर : सोशल मीडियावरून मैत्री करून त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. आमिष देऊन मुंबईला नेले. चार-सहा महिने मौजमजा केली आणि वाऱ्यावर सोडून दिले. अत्याचारातून ती गर्भवती झाली. गर्भ सात महिन्यांचा असल्यामुळे ती गर्भपातही करू शकली नाही. नाजूक वयात प्रसववेदना सहन करीत तिने नुकताच एका बाळाला जन्म दिला. मुलगी अविवाहित असल्यामुळे घरच्यांनी त्या बाळाला उमेद संकल्प नावाच्या एका सामाजिक संस्थेला दत्तक देण्याचा निर्णय घेतला. आता या मुलाला 'उमेद'च्या रुपात हक्काचे घर मिळाले आहे.

ही कहाणी आहे पुलगाव (जि. वर्धा) येथील एका १९ वर्षीय महाविद्यालयीन मुलीची. पीडित मुलीची साधारण एक वर्षापूर्वी सोशल मीडियावरून मुंबईच्या एका मुलाशी मैत्री झाली. फोनवरून बोलणे सुरू झाले. एकेदिवशी मुलाने फोन करून आमिष दाखवून पीडितेला बोलावून घेतले. सॊबत फोन न आणण्याची अटही घातली. 

ठळक बातमी - मृत्यू झाल्यानंतर या धर्मात चक्क गिधाडांच्या स्वाधीन केला जातो मृतदेह; अनोख्या पद्धतीने करता अंत्यसंस्कार

मुलगी साधीभोळी असल्याने त्याच्या भूलथापांना बळी पडली. कॉलेजला जाण्याच्या बहाण्याने ती त्याच्यासोबत निघून गेली. रात्र होऊनही मुलगी घरी न परतल्याने आईवडिलांचीही चिंता वाढली. कुठेही ठावठिकाणा न लागल्याने अखेर त्यांनी पुलगाव पोलिस ठाणे गाठून मुलगी गायब झाल्याची तक्रार केली. 

दरम्यानच्या काळात त्या नराधमाने तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. परंतु ती त्याच्या तावडीतून निसटली आणि थेट आपल्या गावी आली. आईवडिलांना शंका आल्याने त्यांनी पोलिसांच्या मदतीने तिला तपासणीसाठी एका खासगी रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासणी केली असता, ती सात महिन्यांची गर्भवती असल्याचे आढळून आले. सात महिन्यांचा गर्भ असल्याने गर्भपात होऊ शकत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आईवडिलांनी तिला सेवाग्राम येथील रुग्णालयात भरती केले. त्याच रुग्णालयात एका प्रकरणात तिथे गेलेल्या उमेद संकल्प संस्थेच्या मंगेशी मून यांनी या घटनेसंदर्भात कळले. 

मंगेशी यांनी मुलीच्या वडिलांची भेट घेऊन घटनाक्रम सविस्तर जाणून घेतला. बाळाला जन्माला घालण्याची त्यांनी तयारी दर्शविली, पण त्याचवेळी त्याचा स्वीकार न करण्याचीही अट घातली. अखेर ते मूल 'उमेद'ने दत्तक घेण्याचा निर्णय घेत तसे स्टॅम्प पेपरवर लिहूनही घेतले. पण संस्थेकडे आधीच अनेक मुले असल्याने व त्यांची ऐपत नसल्याने त्यांनी दवाखान्याचा खर्च करण्यास असमर्थता दर्शविली. अखेर प्रहार या संघटनेचे अध्यक्ष विकास दांडगे व आदित्य कोटमकर यांनी मदतीचा हात पुढे करत बाळंतपणाचा सर्व खर्च केला.

लवकरच 'उमेद'च्या परिवारात सामील होणार

दोन दिवसांपूर्वीच तिचे बाळंतपण सुखरूप पार पडून पीडितेने एका मुलाला जन्म दिला. सध्या हा मुलगा आईजवळ असून, डिस्चार्ज झाल्यानंतर लवकरच तो 'उमेद'च्या परिवारात सामील होणार आहे. लवकरच त्याचे नामकरणही होणार असल्याचे मंगेशी यांनी सांगितले. चार वर्षांपूर्वी स्थापन झालेली उमेद संकल्प ही संस्था चोर व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पारधी मुलांच्या उत्थानासाठी कार्य करते. संस्थेत सध्या ७० गोरगरीब मुले असून, संस्थेतर्फे त्यांचे शिक्षण व संगोपन केले जाते..

क्लिक करा - हाकलल्यानंतरही सतत रुग्णालयात यायचा श्वान; सत्य आले समोर

युवतींनो, मैत्री करताना सावधान

सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे भोळ्याभाबड्या मुलींशी मैत्री करून त्यांच्यावर अत्याचार करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे अशा घटनांपासून दूर राहण्यासाठी किशोरवयीन मुलींनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन, मंगेशी यांनी यानिमित्ताने केले आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image
go to top