नागपूर - बुधवारपाठोपाठ गुरुवारी अवकाळी मुसळधार पावसाने शहरात हजेरी लावली. विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह बरसलेल्या पावसाने भर उन्हाळ्यात अख्खे शहर धुवून काढले. यामुळे नोकरदारांसह अनेकांची तारांबळ उडाली. पावसामुळे वातावरण गारठल्याने भर उन्हाळ्यात उपराजधानीला ‘हिलस्टेशन’चा ‘फिल’ आला होता.
शहरात पहाटेपासून सरींवर सरी बरसल्या. नंतर दुपारी मात्र धो-धो पावसाने उन्हाळ्याचा विसरच पाडला. मंगळवार व बुधवारी मध्यरात्री वादळाने जोरदार तडाखा दिल्यानंतर गुरुवारीही अपेक्षेप्रमाणे पावसाने चांगलाच गोंधळ घातला. नागपूरकर सकाळी झोपेतून उठले तेव्हा पावसाची रिपरिप सुरू होती. त्यानंतर तासतासाने अधुनमधून सरींवर सरी येत होत्या. मात्र दीड वाजताच्या सुमारास १५ ते २० मिनिटे मेघगर्जनेसह पावसाने चांगलेच झोडपून काढले.
ऐन कार्यालयात जाण्याच्या वेळी पाऊस आल्याने नागपूरकरांची तारांबळ उडाली. त्यामुळे अनेकांना कपाटात ठेवलेले रेनकोट व छत्र्या बाहेर काढाव्या लागल्या. तर पावसापासून बचाव करण्यासाठी काहींना आडोसा शोधावा लागला. जोरदार पावसामुळे जागोजागी सखल भागांमध्ये पाणी साचले होते. रस्त्यांवरून पाण्याचे लोट वाहताना दिसले. अनेक भागांमध्ये वाहनधारकांना चांगलाच त्रास झाला असला तरी, काहींनी गार झालेल्या वातावरणाचा आनंदही घेतला.
वातावरणात गारवा निर्माण झाल्याने ऊन व उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. गरगर फिरणारे पंखे, कुलर व एसीदेखील थंडावले. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या आठवड्यात उन्हाचा पारा भडकल्याने व असह्य उकाडा जाणवला होता. परिणामी नागपूरकरांना यावर्षी लवकर कुलर व एसी सुरू करावे लागले होते.
शिमला, काश्मीरचा फील
पावसामुळे शहरातील एकूणच वातावरण गारठल्याने उपराजधानी दुपारपर्यंत जणू काही ‘हिलस्टेशन’ बनले होते. त्यामुळे भर उन्हाळ्यात अगदी शिमला व काश्मीरसारखे गार वातावरण झाले होते. वातावरण कुल झाल्याने अनेकांनी आल्हाददायक वातावरणाचा मनसोक्त आनंद घेतला.
शुक्रवारनंतर उन्हाचा तडाखा
प्रादेशिक हवामान विभागाने आणखी चोवीस तास काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट दिला आहे. मात्र विदर्भात जोरदार पावसाची शक्यता कमीच आहे. काही भागांत हलक्या सरी येऊ शकतात. त्यानंतर हळूहळू ढग निवळून विदर्भात पुन्हा उन्हाचा भडका उडणार आहे. मध्य भारतात तयार झालेल्या ‘सायक्लॉनिक सर्क्युलेशन’चा प्रभाव आता कमी झाला आहे.
तापमान २६.६ वर
पाऊस व ढगाळ वातावरणामुळे विदर्भातील कमाल तापमानातही मोठी घट झाली. चोवीस तासांत नागपूरचे तापमान ९.२ अंशांनी घसरून २६.६ वर स्थिरावले. तीन दिवसांत तब्बल १४ अंशांची घट झाली. विशेष म्हणजे, सर्वच जिल्ह्यांतील पारा चाळिशीच्या खाली आला आहे. गुरुवारी सर्वात कमी २५ अंश तापमानाची नोंद भंडारा येथे करण्यात आली.
ग्रामीण भागातही बरसला
शहराप्रमाणेच ग्रामीण भागांतही गरुवारी जोरदार अवकाळी पाऊस बरसल्याचे वृत्त आहे. विशेषतः यवतमाळ, गोंदिया, वर्धा व भंडारा या चार जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. अन्य जिल्ह्यांमध्येही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.
पहाटेपासून सरींवर सरी, दुपारी मुसळधार
तापमानात झाली
नऊ अंशांची घट
उपराजधानीला हिलस्टेशनचा ‘फिल’
दुसऱ्याही दिवशी पावसाची दमदार हजेरी
पावसाने केले मिस्टिंगचे काम; रस्त्यांवरील धूळ झाली कमी
नागपूर : शहरातील विविध भागात कुठे ना कुठे बांधकामे सुरू आहेत. कुठे उड्डाणपुलाचे बांधकाम तर, कुठे सिमेंट रस्ते बांधले जात आहेत. अनेक ठिकाणी मलवाहिन्या टाकण्याच्या कामाची भर त्यात पडली आहे. इमारतींची बांधकामेही होत आहेत. परिणामी शहरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. अशात अचानक झालेल्या पावसामुळे शहरातील वायू प्रदूषणावर अंशतः आळाबसला आहे. पावसाने रस्त्यांवरील धुळीसाठी मिस्टिंगचे काम केले आहे. शहरातील चार प्रमुख ठिकाणांहून वायू गुणवत्तेची सतत नोंदणी केली जाते.
हा अहवाल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला पाठवला जातो. या आधारे देशभरातील शहरांचा हवेच्या गुणवत्तेनुसार वर्गीकरण केला जातो. गेल्या ४८ तासांत झालेल्या पावसामुळे आणि वातावरणातील आर्द्रतेमुळे नागपुरात हवेची गुणवत्ता सुधारली असल्याचे सांगितल्या जात आहे. शहरातील रस्त्यांवरील धूळ कमी करण्यासाठी मनपाच्या वतीने मिस्टिंग मशीनचा वापर केला जात आहे. गेल्या दोन दिवसांच्या पावसाने मिस्टिंगच्या तुलनेत अधिक प्रभावीपणे रस्त्यांवरील धूळ कमी केली असल्याचे चित्र दिसून येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.