ऐन परीक्षेच्या काळात लसीकरण; तापाच्या भीतीने अल्प प्रतिसाद

१२ ते १४ वयोगटातील मुलांचे परीक्षेच्या काळात साधल्याने लसीकरणाला सध्यातरी अल्प प्रतिसाद दिसून येत आहे
Vaccination during examination lack response due fear of fever nagpur
Vaccination during examination lack response due fear of fever nagpurShashank Parade

नागपूर : गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा असलेल्या १२ ते १४ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले. परंतु मुहूर्त ऐन परीक्षेच्या काळात साधल्याने लसीकरणाला सध्यातरी अल्प प्रतिसाद दिसून येत आहे. ऐन परीक्षेत लस दिल्यानंतर मुलांना ताप आल्यास परीक्षेला मुकावे लागेल, या भीतीने पालकांतही लसीकरणाबाबत सध्यातरी निरुत्साह दिसून येत आहे.

कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी केंद्र सरकारने १२ ते १४ वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरू केले. महापालिकेने शहरात या वयोगटातील मुलांना देण्यात येत असलेल्या कोर्बेव्हॅक्स लसीसाठी १६ लसीकरण केंद्र सुरू केले. १७ मार्चपासून लसीकरण सुरू करण्यात आले. परंतु जनजागृतीअभावी पहिल्या दिवशी नगण्य प्रतिसाद मिळाला. त्यातच आता सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. १२ ते १४ वयोगटात याच वर्गातील मुलांचा समावेश आहे. लस घेतल्यानंतर ताप येत असल्याचा आतापर्यंतचा सर्वांचाच अनुभव आहे. परीक्षेच्या काळात घेतल्यानंतर मुलांनाही ताप येण्याची भीती पालकांमध्ये आहे. गेल्या दोन वर्षानंतर प्रथमच मुलांच्या ऑफलाईन परीक्षा होत आहे. त्यामुळे मुलांच्या परीक्षेत अडथळा नको, म्हणून अनेक पालकांनी सध्या तरी लस नकोच, अशी भूमिका घेतली आहे. ऐन परीक्षेच्या काळात या मुलांचे लसीकरण सुरू करण्याचा मुहूर्तच चुकल्याचे काही पालकांनी सांगितले. परीक्षेनंतर मात्र मुलांना प्राधान्याने लस देणार, असेही काही पालकांनी नमुद केले. महापालिकेने मात्र लसीकरणासाठी सर्वच तयारी केली आहे. इतर नागरिकांसोबतच १२ ते १४ वयोगटातील मुलांना कोर्बेव्हॅक्स लस देण्यास उत्साहाने सुरवात केली.

शहरात एकूण १६ केंद्रांवर मुलांना लस देण्यात येत आहे. लक्ष्मीनगर झोनमध्ये दीक्षाभूमीजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पोटर्स कॉम्प्लेक्स व जयताळा येथील मनपाचे जयताळा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, धरमपेठ झोनमध्ये बुटी दवाखाना, सदर रोग निदान केंद्र व तेलंगखेडी आयुर्वेदिक दवाखाना, हनुमाननगर झोनमध्ये मानेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र. धंतोली झोनमध्ये आयसोलेशन हॉस्पिटल आणि एम्स हॉस्पिटल, नेहरूनगर झोनमध्ये ताजबाग नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, गांधीबाग झोनमध्ये राजकुमार गुप्ता समाजभवन, सतरंजीपूरा झोनमध्ये मेंहदीबाग नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, लकडगंज झोनमध्ये डिप्टी सिग्नल नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि हिवरीनगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, आशीनगर झोनमध्ये पाचपावली नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल, मंगळवारी झोनमध्ये डिव्हिजनल रेल्वे हॉस्पिटल व इंदोरा प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात मुलांसाठी लसीकरण सुरू करण्यात आहे.

आज लसीकरण बंद

१८ वर्षांवरील सर्वांना कोविशिल्ड, कोवॅक्सिन, १५ ते १८ वयोगटातील मुलांना कोवॅक्सिन आणि १२ ते १४ वर्ष वयोगटासाठी कोर्बेव्हॅक्स लस देण्यात येत आहे. आतापर्यंत रविवारीही लसीकरण केंद्र सुरू ठेवण्यात येत होते. परंतु उद्या रविवार असून कार्यालयीन सुटीमुळे लसीकरण केंद्र बंद राहतील, असे महापालिकेने कळविले आहे.

शहरात सहाशे मुलांचे लसीकरण

मुलांच्या लसीकरणाला १७ मार्चला सुरवात झाली. पहिल्या दिवशी शहरात १७५ मुलांनी लस घेतली. आज शहरातील सहाशे मुलांचे लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत ९९५ जणांचे लसीकरण झाले असून ग्रामीण भागात शहरापेक्षाही अल्प प्रतिसाद दिसून येत आहे. सोमवारपासून शहरात लसीकरणाला वेग येईल, असा दावा करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com