
Valentine Day 2023 : हृदयी फुलणार वसंत, प्रेमाचा दरवळणार गंध !
नागपूर : गेल्या आठवड्याभरापासून तरुणाईला भुरळ घालणाऱ्या व्हॅलेंटाईन विकमधील शेवटचा टप्पा असलेल्या व्हॅलेंटाईन डेनिमित्त पुन्हा एकदा प्रेमाचा गंध दरवळणार आहे. प्रेम या अडीच अक्षरात जग शोधणाऱ्या प्रेमी युगुलांनी एकमेकांसाठी सरप्राईज प्लान तयार केले असून प्रेमाचे प्रतिक असलेल्या भेटवस्तू त्यांना खुणावत असल्याचे मॉलमधील गर्दीमुळे दिसून आले.
परिणामी त्याचा चांद व तिचा चकोर यांच्या गुरुत्कर्षणामुळे प्रेमाची भरती आल्याचे चित्र राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी ठराविक वेळेची गरज नाही. परंतु ‘व्हॅलेंटाईन डे’ला एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्यांसाठी जणू महोत्सवाचाच दिवस असतो. शहरातील तरुणाई अपवाद नाही.
अनेक प्रेमी जोडपे दिलखुलास व्यक्त होतात. त्यासाठीच त्यांची वर्षभरापासून या दिवसाची तयारी सुरू असते. संत्रानगरीतील प्रेमीयुगुलही सेलिब्रेशनमध्ये मागे नाहीत. अनेकांनी आपल्या पार्टनरसाठी सरप्राईज पार्टी, अविस्मरणीय भेटवस्तू आणि हटके सेलिब्रेट करण्याची योजना आखलेली आहे. आपल्या प्रेमाचा सुरेख संदेश अनोख्या पद्धतीने देण्याकडे प्रेमीयुगुलांचा प्रयत्न असल्याचेही मॉल, लहान भेटवस्तू विक्रीच्या दुकानातील आजच्या गर्दीतून दिसून येत आहे. अनेक जण मात्र कुठेतरी भेटून एकमेकांशी नाते आणखी दृढ करण्यासाठी सज्ज झाल्याचे दिसून आहेत.
पारंपारिक सेलिब्रेशनला पसंती
साधारणतः पारंपारिक पद्धतीने व्हॅलेंटाइन-डे साजरा करण्याकडे प्रेमीयुगुलांचा बेत आहे. अनेक जण लाल रंगाचा पेहराव घालून आपल्या साथीदाराला लाल गुलाब किंवा बदामी आकाराचा लाल फुगा गिफ्ट करण्याच्या तयारीत आहेत. गोड म्हणून चॉकलेट आणि केक खाऊन आनंद व्यक्त केला जाणार. गेल्या काही वर्षात व्हॅलेंटाईन डेला विरोध बघता अनेकांनी सावधगिरी बाळगत तिला किंवा त्याला भेटण्यासाठी निर्जनस्थळी जाण्याचा बेत आखला आहे.
असाही साजरा होणार प्रेमदिवस
अनेक रेस्टारेंट्स संचालकांनी खास व्हॅलेंटाइन-डेसाठी पार्टी आणि आकर्षक डिस्काऊंटमध्ये फुड पॅकेजेसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे एका ‘रोमांटिक डिनर डेट’साठीही तयारी केली आहे. एवढेच नव्हे उद्या शॉपिंग मॉल्समध्येही विविध वस्तुंवर मोठी सूट मिळणार आहे. त्यामुळे शॉपिंगचा आनंद प्रेमीयुगुल किंवा पती-पत्नीना लुटता येणार आहे. चित्रपट पाहून संपूर्ण दिवस प्रियकरासोबत घालवत ही हा दिवस साजरा करता येऊ शकतो. प्रेमाची आठवण म्हणून एकमेकांना छोटे रोपटे भेट देऊनही हे ‘सेलिब्रेशन’ अविस्मरणीय करण्याचा बेत अनेकांनी आखला आहे.
‘व्हॅलेंटाइन डे’चा इतिहास
हीर-रांझा, रोमिओ-ज्युलिएट आणि लैला मजनू अशा असंख्य प्रेमळ जोड्या आपल्याला प्रत्येक संस्कृतीत पाहायला मिळतात. म्हणजेच स्त्री-पुरुषाचे प्रेम ही कुणा एका संस्कृतीची मक्तेदारी नाही. रोममध्ये तब्बल आठशे वर्षापूर्वी पासून हा दिवस साजरा करण्याची सुरवात झाली.
केलेडियस द्वितीय या रोमन सम्राटाच्या कारकिर्दीत प्रेम आणि प्रेमविवाह करण्यास बंदी होती. कॅलेडसच्या हुकुमाविरोधात धर्मगुरू व्हॅलेंटाइन यांनी प्रेमिक सैनिकांची लग्ने लावण्यास सुरवात केली होती. म्हणून त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. त्याची आठवण म्हणून १४ फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण जगभरात व्हॅलेंटाइन-डे म्हणून साजरा केला जातो.
बजरंग दलाकडून इशारा रॅली
व्हॅलेंटाईन डे साजरा करणाऱ्यांच्या विरोधात बजरंग दलाने तयारी केली आहे. व्हॅलेंटाईन डे ही कुप्रथा असून त्याविरोधात इशारा रॅली काढण्याचा निर्णय घेतला असल्याचे बजरंग दल कार्यकर्त्यांनी कळविले आहे. मंगळवारी दुपारी १२ वाजता काटोल रोड छावनी येथील दुर्गा माता मंदिरापासून या रॅलीला सुरवात होईल.